जुळून आल्या रेशीमगाठी ! विधवा भावजय सोबत लहान दिराने घेतले ‘सात फेरे’

अहमदनगर: असं म्हणतात समाजात विधवा महिलेला एकटीने जगणं फार कठीण असतं. मात्र अशा कठीण काळात तिला साथ देणारे अगदी क्वचितच पाहायला मिळतात. त्यातही तिच्या आयुष्यात पुन्हा नव्याने रंग भरणारे तर शोधूनही सापडणार नाहीत. परंतु, या सर्व विचारांना फाटा दिला आहे अहमदनगरच्या एका तरुणाने. या तरुणाने आपल्या मोठ्या भाव्याच्या मृत्यूनंतर त्याच्या पत्नीसोबत म्हणजेच भावजयसोबत विवाह करून तिच्या आयुष्यात पुन्हा एकदा आनंद निर्माण केला आहे.

महेंद्र मोटे असे या तरुणाचे नाव आहे. आपल्या मोठ्या भावाची पत्नी प्रांजली लग्नाचे सात फेरे घेऊन घरात आली. त्यानंतर काही वर्षानंतर घरात पाळणाही हलला. मात्र हे सर्व आनंदी आनंद सुरु असताना त्यांच्या आनंदावर विरजण पडले. काळाने झडप घातली आणि महेंद्रचा मोठा भाऊ महेश मोटे यांचा अपघाती मृत्यु झाला.

या घटनेनंतर प्रांजलीवर दु:खाचा डोंगर कोसळला होता. मात्र त्यांच्या या कठीण प्रसंगात त्यांचा लहान दीर महेंद्र पुढे आला. सर्व परंपरा आणि रितीभातींना दूर सारून आपल्या वहिनीशी लग्न करण्याचा निर्णय त्याने घेतला. दोघांच्या होकारानंतर घरातील सर्वांची सहमती घेऊन त्यांचा विवाह आज पार पडला.

दरम्यान, महेंद्र आणि त्याच्या घरच्यांनी समाजातील लोक, गावकरी, मित्र आणि पाहुणे मंडळी काय म्हणतील?, असा कोणताही विचार न करता त्यांनी विवाह केला. त्यांच्या या कृतीने समाजाला एक आदर्श घालून दिला आहे. महेंद्र आणि प्रांजली या दोघांना पाहुणे मंडळी, वऱ्हाडीमंडळींनी आशीर्वाद देत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.