पुणे – विवाहितेचा शारीरिक आणि मानसिक छळ केल्याप्रकरणात वाकड पोलिसात दाखल असलेल्या गुन्ह्यात पती, दिर, नणंद, सासु-सासऱ्याला विशेष न्यायाधीश एम.एम.देशपांडे यांनी अटकपूर्व जामीन मंजुर केला आहे. या प्रकरणाचा गुन्हा दाखल करण्यापूर्वी विवाहितेच्या माहेरच्या मंडळींनी सासरच्या मंडळींना मारहाण केली होती.
याबाबत गुन्हा दाखल झाला होता. त्याला उत्तर देण्यासाठी विवाहितेच्या छळाचा खोटा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी प्रत्यक्ष कोणताही गुन्हा केलेला नाही. त्यामुळे सर्वांना अटकपूर्व जामीन द्यावा. ते पोलिसांना तपासास सहकार्य करण्यास तयार असल्याचा युक्तीवाद बचाव पक्षातर्फे ऍड. विजयकुमार ढाकणे यांनी केला. त्यानुसार न्यायालयाने हा निकाल दिला.
पती राजेंद्र, दीर योगेश, सासरे लक्ष्मण अण्णा दगडे, शोभा आणि अर्चना चौटमहन अशी अटकपूर्व मिळालेल्यांची नावे आहेत. बचाव पक्षातर्फे ऍड. विजयकुमार ढाकणे, ऍड. राणी ढाकणे, ऍड. सारीका पोटभरे आणि सिध्दार्थ जाधव यांनी बाजू मांडली. पतीचे शेजारच्या महिलेशी अनैतिक संबंध होते. त्याबाबत विचारणा केल्याने तिला मारहाण करण्यात आले.
तसेच माहेरहून घर बांधण्यासाठी 15 लाख रुपये आणण्यासाठी तिच्यावर दबाव टाकण्यात येत होत. तिला मारहाण करण्यात आली. त्यामुळे तिने पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून 498 (अ) विवाहितेचा छळ, 323 (मारहाण) आणि 506 (धमकावणे) च्या कलमानुसार गुन्हा दाखल केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणात अटकपूर्व जामिनासाठी केलेला अर्ज न्यायालयाने मंजुर केला.