गांधीनगर – पंजाबमध्ये विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या प्रचंड बहुमतानंतर आम आदमी पक्षाच्या गोटात उत्साह संचारला आहे. आता पक्षाचे समन्वयक अरविंद केजरीवाल यांनी गुजरातकडे लक्ष केंद्रीत केले असून या राज्यातून आता येत्या 15 मे रोजी परिवर्तन यात्रा सुरू करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे हिंदु मंदिरात पुजा करून ही यात्रा सुरू केली जाणार असल्याचे आप गुजरातमध्ये हिंदुत्व कार्ड खेळणार का, अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.
हिंदुत्वाच्याच मुद्द्यावर भारतीय जनता पार्टीला टक्कर देण्याची आपची तयारी आहे. गुजरातच्या सर्व 182 विधानसभा मतदारसंघांतून पक्षाची यात्रा जाणार आहे. या यात्रेदरम्यान लहान आणि मोठ्या गावांमधील नागरिकांशी संपर्क साधला जाणार आहे. भारतीय जनता पार्टीच्या आतापर्यंतच्या राजवटीत कोणकोणत्या मुद्द्यांवर काम होणे आवश्यक होते व मात्र ते झालेले नाही. हे मतदारांना सांगितले जाणार आहे.
20 दिवसांच्या यात्रेत 10 लाख मतदारांशी संपर्क साधण्याचा यातून प्रयत्न केला जणार आहे. पथनाट्ये, नुक्कड नाटक, प्रभात फेरी आणि रात्री मशाल रॅली आदी माध्यमांतून सगळे मतदारसंघ पिंजून काढण्याचा आपचा प्रयत्न आहे. यात्रेच्या सुरूवातीच्या टप्प्यात आपच्या सहा वेगवेगळ्या शहरांत जाणार असून या शहरांतील नागरिकांचा रिस्पॉन्स जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे. सुप्रसिध्द सोमनाथ मंदिर आणि द्वारकाधीश मंदिरात दर्शन घेऊन आपचे नेते या यात्रांना सुरूवात करणार आहेत.
गेल्या विधानसभेच्या निवडणुकीत कॉंग्रेसने सत्ताधारी भाजपसमोर जबरदस्त आव्हान निर्माण केले होते. हार्दिक पटेल, अल्पेश ठाकोर आणि जिग्नेश मेवानी आदी युवानेत्यांची दमदार कुमक कॉंग्रेसला मिळाली होती. राहुल गांधी यांची आक्रमक भाषणे आणि मंदिरांच्या भेटींमुळे भाजपसमोर आव्हान निर्माण झाले होते. त्यामुळे भाजप जेमतेम बहुमतापर्यंत पोहोचली. मात्र नंतर लोकसभा निवडणूक आणि पुन्हा मोदी लाट व त्यानंतर कॉंग्रेसला जी गळती लागली ती आजतागायत सुरूच आहे. कॉंग्रेसच्या बऱ्याच आमदारांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजपशी घरोबा केला आहे.
त्यामुळे कॉंग्रेसची अवस्था खिळखिळी झाली आहे. नेमकी हिच संधी साधत आता आप कॉंग्रेसची जागा व्यापण्याचा प्रयत्न करते आहे. काही महापालिका निवडणुकांत याचा प्रत्ययही आला आहे. गुजरातच्या जनतेला योग्य पर्याय मिळाला तर ती आपचा स्विकार करेल. ते भाजपसाठी आव्हानात्मक असेल, मात्र त्याहीपेक्षा कॉंग्रेसला अधिकच खच्ची करणारे असेल.