रांची -झारखंडमध्ये मंगळवारी नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यातून भाजपचे माजी आमदार गुरूचरण नायक नशीब बलवत्तर असल्याने बचावले. मात्र, त्यांचे अंगरक्षक असणाऱ्या दोन पोलिसांची नक्षलींनी निर्घूण हत्या केली.
झारखंडच्या पश्चिम सिंहभूम जिल्ह्यातील एका गावात फुटबॉल सामन्याचे आयोजन करण्यात आले होते. प्रमुख पाहुणे म्हणून नायक त्या सामन्यावेळी उपस्थित राहिले. सामना संपताच प्रेक्षकांमध्ये बसलेल्या नक्षलवाद्यांच्या गटाने नायक यांच्यावर हल्ला केला.
नक्षलींनी प्रथम गोळीबार केल्याचे समजते. त्यामुळे मोठा गोंधळ उडाला. त्यावेळी पोलीस अंगरक्षक मदतीसाठी पुढे सरसावल्याने हल्ल्याच्या ठिकाणावरून निघून जाण्यात नायक यशस्वी ठरले. मात्र, नक्षलींनी डाव साधत दोन अंगरक्षकांची हत्या केली. त्यांचे गळे चिरण्यात आल्याचे समजते.
मृत्युमुखी पडलेले अंगरक्षक आणि आणखी एका पोलिसाकडील 3 एके-47 रायफली हिसकावून नक्षलींनी घटनास्थळावरून पलायन केले. संबंधित हल्ल्याची माहिती मिळताच अतिरिक्त सुरक्षा बळ घटनास्थळी धाडण्यात आले. हल्ला झालेले गाव जंगलव्याप्त भागात वसलेले आहे. दुर्गम भाग असल्याने हल्ल्याविषयीचा अधिक तपशील तातडीने मिळू शकला नाही.