नवी दिल्ली – बिहारमधील नक्षलवाद्यांच्या हस्तकाची 27 लाख रुपयांची मालमत्ता सक्तवसुली संचलनालयाने आज जप्त केली. मनी लॉन्डरिंग प्रकरणाच्या तपासाचा भाग म्हणून ही मालमत्ता जप्त करण्यात आली. माओवादी दिलीप साहनी उर्फ नितेश याच्या कुटुंबातील सदस्य आणि अन्य सहकाऱ्यांवर ही कारवाई करण्यात आली.
मनी लॉन्डरिंग कायद्यातील प्रतिबंधक कलमांतर्गत सक्तवसुली संचलनालयाने तीन भूखंड, भारतीय जीवन विम्याच्या पॉलिसी, माटरसायकल, मुदत ठेवी आणि बॅंकांमधील ठेवी, अशी 27 लाख 87 हजार रुपयांची मालमत्ता जप्त केली.
वेगवेगळ्या गुन्ह्यांमधून मिळवलेली माया विविध अचल मालमत्तांमध्ये गुंतवण्यात आली होती. तसेच कुटुंबीयांच्या नावे बॅंकांमध्ये ठेवीच्या स्वरुपात ठेवण्यात आली होती, असे ईडीने म्हटले आहे.
दिलीप साहनी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरोधात बिहार पोलिसांकडून हत्या, गुन्हेगारी कारस्थान करणे, शस्त्रांचा आणि स्फोटकांचा वापर आदी किमान डझनभर प्रकरणे दाखल करण्यात आली आहेत. याची दखल घेऊन ईडीने मनी लॉन्डरिंगचे प्रकरणही दाखल केले आहे.