रांची – झारखंडमधील काँग्रेस आमदार अंबा प्रसाद यांचीही आता ईडीकडून चौकशी सुरू करण्यात आली आहे. तथापि आपण या चौकशीच्या कामी ईडीला पुर्ण मदत करू, असे अंबा प्रसाद यांनी म्हटले आहे. आजच आपण ईडीच्या समन्स नुसार त्यांच्यापुढे चौकशीसाठी हजर होणार आहोत, असे त्यांनी पत्रकारांना सांगितले. ईडीने यापूर्वी कॉंग्रेस आमदार अंबा प्रसाद यांना ४ एप्रिलला आणि त्यांचा भाऊ अंकित साओ यांना ५ एप्रिलला समन्स बजावले होते. (Congress MLA Amba Prasad from Jharkhand questioned by ED)
१४ मार्च रोजी, ईडीने योगेंद्र साओ, अंबा प्रसाद आणि त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्य आणि सहकाऱ्यांशी संबंधित रांची हजारीबाग, आणि झारखंडमधील २० ठिकाणी छापे घातले होते. खंडणी वसुली, बेकायदेशीर वाळू उत्खनन, जमीन बळकावणे यासारख्या गुन्हेगारी कारवायांशी संबंधित प्रकरणाच्या अनुषंगाने हा शोध घेण्यात आला.
या छाप्यात ३५ लाख रुपये किमतीची रोख रक्कम (अंदाजे), डिजिटल उपकरणे, मंडल कार्यालये, बँका इत्यादींचे बनावट शिक्के, हस्तलिखीत पावत्या/डायरी इत्यादी स्वरूपातील कागदपत्रे आणि अवैध वाळूशी संबंधित पुरावे जप्त करण्यात आले आहेत, असे तपास संस्थेने सांगितले. सूत्रांनुसार, ईडीच्या रांची विभागीय कार्यालयात काँग्रेस आमदाराविरुद्ध २०२३ मध्ये मनी लाँड्रिंगची तक्रार दाखल करण्यात आली होती.