नेवासा (राजेंद्र वाघमारे) – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फूट पडल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार पक्षाच्या बांधणीकडे स्वतः लक्ष देत आहेत. यासाठी रोज ठीक ठिकाणच्या कार्यकर्त्यांचा अजित पवार यांच्या गटामध्ये प्रवेश होताना पाहायला मिळत आहे. अशात अहमदनगरचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष आणि शेवगांव – पाथर्डी मतदार संघाचे माजी आमदार चंद्रशेखर घुले – पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतल्याचे समोर आले आहे. गुरुवारी मुंबईमध्ये ही भेट झाल्याचे समजते.
चंद्रशेखर घुले – पाटील यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसला पाठिंबा दिल्यास नगर जिल्ह्यातील राजकिय समिकरणे बदलण्याची शक्यता असल्याच्या चर्चा सध्या स्थानिक राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत.
माजी आमदार चंद्रशेखर घुले – पाटील हे जयंत पाटील यांचे नातेवाईक आहेत. ते अजित पवार यांच्यासोबत गेल्यास नगर जिल्ह्यातील राजकिय समिकरणे बदलू शकतात. यामुळे घुले – पाटील नेमकी काय भूमिका घेणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
नुकत्याच झालेल्या जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणूकीत घुले – पाटील यांचा अवघ्या एका मताने पराभव झाला होता. या पराभवाचे शल्य त्यांच्या चांगलेच जिव्हारी लागले होते. अशात घुले पाटील यांनी अजित पवारांसोबत जाऊन वेगळी राजकीय वाट निवडल्यास त्याचा स्थानिक राजकारणावर मोठा परिणाम होऊ शकतो. ,