कोलकात्याचे माजी पोलिस आयुक्त राजीव कुमार भूमिगत ?

शारदा चिटफंड घोटाळ्यातील पुरावे नष्ट केल्याचा राजीव कुमार यांच्यावर आरोप

कोलकाता : पश्‍चिम बंगालमधील शारदा चिट फंड घोटाळ्याच्या प्रकरणात कोलकात्याचे माजी पोलिस आयुक्त राजीव कुमार यांच्या अटकेला दिलेले संरक्षण कलकत्ता उच्च न्यायालयाने काढून घेतल्यानंतर त्यांना सीबीआय कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले होते. परंतू, आज सकाळपर्यंत राजीव कुमार यांनी सीबीआय कार्यालयात हजेरी लावली नसल्याची माहिती समोर येत आहे. तसेच सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी कोलकाता विमानतळाच्या अधिकाऱ्यांना सजग राहण्याचे आदेश दिले आहेत.

राजीव कुमार यांनी चौकशीसाठी हजर व्हावे यासाठी सीबीआयने त्यांना नोटीस जारी केली होती. मात्र, या नोटीसीला कोणतेही उत्तर न देता सध्या राजीव कुमार हे भूमिगत झाल्याचे म्हटले जात आहे. कुमार हे सध्या पश्‍चिम बंगालमध्ये सीआयडीचे अतिरिक्त महासंचालक असून राज्य सरकारने शारदा चिट फंड घोटाळ्यात नेमलेल्या चौकशी पथकात ते सहभागी होते. नंतर सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाची चौकशी 2014 मध्ये केंद्रीय अन्वेषण खात्याकडे दिली होती. राजीव कुमार यांनी या प्रकरणाची चौकशी करताना पुरावे नष्ट केल्याचा आरोप आहे. याच प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सीबीआयने त्यांना कार्यालयात हजर राहण्याचे आदेश दिले होते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.