भारतातील सर्वात यशस्वी गोलंदाजांपैकी एक असलेल्या हरभजन सिंगने 24 डिसेंबर रोजी सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. तो 23 वर्षे क्रिकेट खेळला. क्रिकेटला अलविदा केल्यानंतर हरभजन सिंगने मंकीगेटचे सत्य सांगितले आहे. 2008 मध्ये सिडनी कसोटीदरम्यान हरभजन सिंग आणि ऑस्ट्रेलियन क्रिकेटर अँड्र्यू सायमंड्समध्ये वाद झाला होता. त्यानंतर या वादास मंकीगेट नाव ठेवण्यात आले होते.
सिडनी कसोटीत झाला होता वाद
हरभजन सिंग आणि ऑस्ट्रेलियाचा माजी अष्टपैलू खेळाडू अँड्र्यू सायमंड्स यांच्यातील वादाला नवे वळण मिळाले जेव्हा त्याचे वांशिक वादात रूपांतर झाले. कसोटी सामन्याच्या शेवटच्या दिवशी,ऑस्ट्रेलियाचा तत्कालीन कर्णधार रिकी पाँटिंगने पंच स्टीव्ह बकनर आणि मार्क बेन्सन यांच्याकडे तक्रार केली की हरभजनने सायमंड्सला ‘माकड’ म्हणून संबोधून वर्णद्वेषाने अपमानित केले होते. सिडनी कसोटीत ऑस्ट्रेलियाने भारताचा 122 धावांनी पराभव केला होता. मात्र मंकीगेटचा वाद कोर्टरूममध्ये चालू झाला.
मंकीगेटचे सत्य सांगणार हरभजन
हरभजन सिंगने या घटनेचा खुलासा करत म्हटले की, ही कदाचित त्याच्या कारकिर्दीतील सर्वात मोठा खालचा स्थर होता. या घटनेबद्दल हरभजन कधीच सार्वजनिकपणे बोलला नाही. मात्र 41 वर्षीय माजी क्रिकेटपटू हरभजनने या घटनेचे सत्य मांडणार असल्याचा खुलासा केला आहे.
पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलताना हरभजन म्हणाला की, ही अशी गोष्ट आहे ज्याची गरज नव्हती. त्या दिवशी सिडनीत जे काही घडले ते घडायला नको होते आणि हे ही यामुळे काय झाले होते. ते खरोखरच अनावश्यक होते. पण कोण काय म्हणाले हे विसरून जा. तुम्हाला आणि मला दोघांनाही माहीत आहे की सत्याला दोन बाजू असतात.
आत्मचरित्रातून करणार खुलासा
संपूर्ण प्रकरणामध्ये माझ्या सत्याच्या बाजूची कोणीही पर्वा केली नाही, त्यावेळी मी काय करत आहे याची कोणालाच पर्वा नव्हती आणि मी मानसिकदृष्ट्या कसा अस्वस्थ होतो, मी कधीच या प्रकरणाला फुगवून सांगितले नाही. पण माझ्या आगामी आत्मचरित्रातून लोकांना ते कळेल, माझ्यासोबत जे घडले ते कोणाच्याही बाबतीत घडू नये.