मुंबई – राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना सीबीआयने (CBI) आणखी एक मोठा झटका दिला आहे. 2021 मधील अहवाल प्रकरणात अनिल देशमुख यांची मुलगी आणि सुनेवर आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. दोन वर्षानंतर सीबीआयने पुरवणी आरोपपत्र दाखल केले आहे. मुंबईतील बार आणि रेस्टॉरंटकडून वसुली केल्याचा आरोप करण्यात आला होता, या संदर्भातील हा अहवाल आहे.
आरोपपत्रात अनिल देशमुख यांची मुलगी पूजा आणि सून राहत देशमुख यांच्या विरोधात हे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. 2021मधील अहवाल माध्यमांमध्ये लिक प्रकरणात हे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. सीबीआयच्या विशेष न्यायालयात हे आरोपपत्र दाखल करण्यात आले असून त्यात पूजा हिच्यावर कट रचल्याचा आरोप करण्यात आला आहे. पूजा यांनी हा अहवाल मिळवण्यासाठी अनिल देशमुख यांचे वकील आनंद दिलीप डागा यांच्या सोबत कट रचला होता. त्यासाठी सीबीआयचे उपनिरीक्षक अभिषेक तिवारी यांना अहवाल देण्यासाठी लाच देण्याची योजना तयार करण्यात आली होती. 29 ऑगस्ट 2021 रोजी हा अहवाल माध्यमांमधून लीक झाला होता.(Ncp)
मुंबईचे तत्कालीन पोलिस आयुक्त परमवीर सिंग (Paramveer Singh) यांनी अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. मुंबईतील बार आणि रेस्टॉरंटकडून कोट्यवधी रुपयांची वसुली होत असल्याचा आरोप त्यांनी केला होता. या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने चौकशी करण्याचे आदेश दिले होते. त्यासंदर्भातील अहवाल तयार केला गेला. हा अहवाल पूजा हिने लीक केल्याचा हा आरोप आहे. त्या अहवालात अनिल देशमुख यांनी कोणताही गुन्हा केला नाही, असे म्हटले असल्याचा दावा करण्यात आला होता. या प्रकरणात सीबीआयचे उपनिरीक्षक अभिषेत तिवारी आणि अनिल देशमुख यांचे वकील डागा यांना अटकही झाली होती.
इतरही नातेवाईक आरोपी
या प्रकरणाची चौकशी उच्च न्यायालयाच्या निर्देशावर सीबीआय करत होती. पूजा, राहत यांच्यासोबत अनिल देशमुख यांचे इतर नातेवाईक विक्रांत देशमुख आणि सयाजीत वायल यांनाही यात आरोपी करण्यात आले आहे. आरोपपत्र दाखल करण्यापूर्वी सीबीआयने त्यांची चौकशी केली होती. परंतु ताब्यात घेतले नव्हते. मात्र, आता आरोपपत्र दाखल झाल्याने त्यांना ताब्यात घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.