अहमदाबाद – गुजरात मधील माजी आयपीएस अधिकारी डी. जी. वंजारा यांना निवृत्तीनंतर सहा वर्षांनी प्रमोशन देण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. वंजारा यांच्या बढतीची जी अधिसूचना राज्याच्या गृह विभागाने जारी केली आहे त्याची प्रत स्वता वंजारा यांनी ट्विटरवर टाकली आहे. त्यांना 29 सप्टेंबर 2007 पासून पुर्व लक्षी प्रभावाने बढती देण्यात आल्याचे त्यात नमूद करण्यात आले आहे.
र्वंजारा हे इशरत जहा आणि सोहराबुद्दीन हत्या प्रकरणातील आरोपी होते. पण त्यांची नंतर या दोन्ही प्रकरणातून निर्दोष सुटका झाली आहे. वंजारा हे 1987 च्या आयपीएस बॅचचे अधिकारी आहेत. ते उपपोलिस महानिरीक्षक या पदावरून 31 मे 2014 रोजीच निवृत्त झाले आहेत. त्यांना सोहराबुद्दीन बनावट चकमक प्रकरणात मे 2007 मध्ये निलंबीत करण्यात आले होते व त्यांना याच प्रकरणात अटकही करण्यात आली होती. नंतर त्यांना इशरत जहा बनावट चकमक प्रकरणातही आरोपी करण्यात आले होते.
या दोन्ही प्रकरणात ते तब्बल सात वर्षे कारागृहात होते. आपल्याला निवृत्ती नंतरही जे प्रमोशन देण्यात आले आहे त्याबद्दल त्यांनी राज्य सरकार आणि केंद्र सरकार या दोघांचेही आभार मानले आहेत.