नवी दिल्ली – भारत आणि अमेरिका यांनी 3 अब्ज डॉलरच्या संरक्षण कराराला अंतिम रुप दिले असून आरोग्य आणि तेल क्षेत्रासह तीन करारांवर सह्या झाल्या आहेत. दोन्ही देशांच्या आरोग्य खात्यांनी मानसिक आरोग्याबाबत सामंजस्य करार केला आहे. दुसरा सामंजस्य करार वैद्यकीय उत्पादनांच्या सुरक्षिततेबाबतचा आहे. दोन्ही देशांच्या आरोग्य विभागांमध्ये मानसिक आरोग्याबाबतचा एक सामंजस्य करार करण्यात आला.
वैद्यकीय उत्पादनांच्या सुरक्षिततेबाबतचा आणखी एक सामंजस्य करार करण्यात आला असून त्यावर केंद्रीय औषध मानक नियंत्रण संघटना आणि अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी सह्या केल्या. इंडियन ऑईल आणि एग्झॉन मोबिल इंडिया एलएनजी लिमिटेड आणि अमेरिकेची चार्ट इंडस्ट्रीज आयएनसी यांनी सहकार्यपत्रावर सह्या केल्या.
भारताच्या दौऱ्यावर आलेले अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी प्रदीर्घ चर्चा केल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन्ही देशांदरम्यान वाढत चाललेल्या सामरिक संबंधांचे प्रतिबिंब संरक्षण सहकार्यात पाहायला मिळत असल्याचे सांगितले.
दहशतवादाच्या पाठीराख्यांचे उत्तरदायित्व निश्चित करण्यासाठी आणखी प्रयत्न करण्याचा दोन्ही देशांच्या नेत्यांनी निर्णय घेतला आहे. तसेच अमली पदार्थांच्या तस्करीला आळा घालण्यासाठी नवी यंत्रणा निर्माण करण्याबाबत सहमती व्यक्त केल्याची माहिती पंतप्रधानांनी दिली.
खुल्या, न्याय्य आणि संतुलित व्यापारासाठी दोन्ही देश वचनबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले. अमेरिकेची तीन अब्ज डॉलरची अत्याधुनिक लष्करी युद्धसामग्री खरेदी करण्यासाठी करार करून, भारत आणि अमेरिका यांनी संरक्षण विषयक सहकार्याची व्याप्ती वाढवली असल्याचे ट्रम्प यांनी निवेदनात सांगितले होते. इस्लामी दहशतवादापासून आपापल्या देशाच्या नागरिकांचे संरक्षण करण्याच्या वचनबद्धतेची त्यांनी हमी दिली.