कोची – भारताचे माजी फुटबॉलपटू चंद्रशेखर मेनन यांचे मंगळवारी वृद्धापकाळाने निधन झाले. ते 85 वर्षांचे होते. गेले काही महिने चंद्रशेखर विविध आजारांनी ग्रासले होते. मंगळवारी कोची येथील राहत्या घरी त्यांची प्राणज्योत मालवली.
चंद्रशेखर यांनी 1962 सालच्या आशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या भारतीय फुटबॉल संघाचे प्रतिनिधित्व केले होते. चंद्रशेखर यांनी भारतीय संघाचे कर्णधारपदही भुषवले होते.
1960 सालच्या रोम ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेल्या भारतीय संघाचे ते सदस्य होते. 1958 ते 1966 या काळात एकूण 25 सामन्यांत त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले.
स्थानिक फुटबॉलमध्ये 1959 ते 1965 या कालावधीत त्यांनी महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले. त्यांच्या निधनाबद्दल भारतीय तसेच जगभरातील समकालीन तसेच सध्या खेळत असलेल्या फुटबॉलपटूंनी शोक व्यक्त केला आहे.