नवी दिल्ली – टोकियो ऑलिम्पिकमध्ये अफलातून कामगिरी केलेल्या भारताच्या पुरुष आणि महिला हॉकी संघातील दोन खेळाडूंसाठी आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाने (एफआयएच) यावर्षीच्या सर्वोत्तम हॉकी खेळाडूंच्या पुरस्कारासाठी नामांकनदिले आहे. पुरुष संघाचा कर्णधार हरमनप्रीत सिंग आणि महिला संघाची अव्वल खेळाटू गुरजीत कौर यांना महासंघाकडून नामांकन मिळाले आहे.
महासंघाच्या पुरस्कारात केवळ सर्वोत्तम खेळाडूंचाच नव्हे तर, प्रशिक्षक व सपोर्ट स्टाफमधील व्यक्तींनाही नामांकन देण्यात येते. त्यातही काही भारतीय संघातील व्यक्तींचा समावेश आहे. पुरुष संघाचा गोलकीपर पी. आर. श्रीजेशला सर्वोत्तम गोलकीपरचे, तर, महिलांमध्ये सविता पुनियाला नामांकन मिळाले आहे. भारतीय पुरुष संघाचे मुख्य प्रशिक्षक ग्राहम रीड आणि महिला संघाचे प्रशिक्षक शोर्ड मारिन यांना सर्वोत्तम प्रशिक्षक पुरस्काराचे नामांकन देण्यात आले आहे.
हरमनप्रीतने टोकियो ऑलिम्पिकमध्ये आठ सामन्यात सहा गोल केले होते. महिला संघ चौथ्या स्थानावर राहिला होता मात्र, त्यांनी प्रथमच ब्रॉंझपदकाचा सामना खेळला. त्यात ग्रेट ब्रिटनने भारतीय महिलांचा पराभव केला.
मात्र, या सामन्यात गुरजीत कौरने 2 गोल केले होते. युवा खेळाडूच्या पुरस्कारात महिलांमध्ये भारताची शर्मिला देवी तर, पुरुषांमध्ये विवेक प्रसाद यांना नामांकन मिळाले आहे. या सर्व पुरस्कारांचे विजेते मतदानाच्या आधारावर ठरवले जाणार आहेत. मतदानासाठी 15 सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. विजेत्यांची घोषणा ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला होणार आहे.