थिरूवनंतपूरम – केंद्रीय मंत्री आणि भाजपचे उमेदवार राजीव चंद्रशेखर यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी आणि कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर यांना कायदेशीर नोटीस बजावली. थरूर यांनी बदनामी केल्याचा आरोप चंद्रशेखर यांनी केला आहे.
केरळमधील थिरूवनंतपूरम लोकसभा मतदारसंघातून थरूर आणि चंद्रशेखर एकमेकांविरोधात निवडणूक लढवत आहेत. त्यातून त्यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या आहेत. अशात थरूर यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली.
त्यावेळी त्यांनी मतदारांना लाच दिली जात असल्याचा आरोप करत चंद्रशेखर यांना लक्ष्य केले. त्याविषयी नाराजी व्यक्त करून चंद्रशेखर यांनी थरूर यांना नोटीस धाडली. प्रतिमा मलिन करण्यासाठी थरूर खोटी माहिती पसरवत असल्याचा प्रत्यारोप त्यामध्ये करण्यात आला.
थरूर यांची वक्तव्ये आचारसंहितेचा भंग करणारी आहेत. त्यांनी तातडीने सर्व आरोप मागे घ्यावेत. बिनशर्त माफी मागावी. भविष्यात बदनामी करणे टाळावे, अशा मागण्या नोटिसीतून करण्यात आल्या आहेत.
नोटीस मिळाल्यानंतर २४ तासांत थरूर यांनी मला अपेक्षित प्रतिसाद द्यावा. अन्यथा, पुढील कायदेशीर प्रक्रिया केली जाईल, असा इशारा चंद्रशेखर यांनी दिला आहे.