मुंबई: कॉंग्रेस नेते आणि माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे यांनी करोनावर यशस्वीपणे मात केली आहे. गेले 20 दिवस मुंबईतील रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली. त्यांना शनिवारी रात्री डिस्चार्ज देण्यात आल्यानंतर हंडोरे घरी परतले आहेत.
करोना विषाणूचा प्रादुर्भाव झाल्यापासूनच चंद्रकांत हंडोरे चेंबुरच्या जनतेला मदत करण्यासाठी सरसावले. विशेषतः पी. एल. लोखंडे मार्ग परिसरातील जनतेच्या सर्व प्रकारच्या मदतीसाठी ते दिवसरात्र मेहनत घेतली. या कालावधीत त्यांना करोनाची लागण झाल्याचे समोर आले. हंडोरे यांच्या तीन चाचण्या करोना पॉझिटीव्ह आल्याने धाकधूक वाढली होती. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार करण्यात आले. उपचारानंतर चंद्रकांत हंडोरे यांची चौथी टेस्ट घेण्यात आली. या टेस्टचा अहवाल निगेटीव्ह आल्याने मोठा दिलासा मिळाला.
चंद्रकांत हंडोरे करोनामुक्त झाल्याचे समजताच कार्यकर्त्यांच्या अंगातही उत्साह संचारला. हंडोरे हे चेंबूरचे माजी आमदार आणि माजी सामाजिक न्यायमंत्री आहेत. महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे ते महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष आहेत.