मायणी/कलेढोण (वार्ताहर) -मुंबईतून दुचाकीवरून एकटाच पाचवड, ता. खटाव येथे आलेला पोलीस कर्मचारी करोनाबाधित आढळल्याने गावात घबराट पसरली आहे.
हा कर्मचारी 15 मे रोजी गावात आला होता. त्याचे वय 56 वर्षे आणि मधुमेहाचा त्रास असल्याने विश्रांतीसाठी वरिष्ठांनी त्याला रजेवर पाठवले होते.हा कर्मचारी पाचवड येथे आल्यानंतर त्याला चौदा दिवस जयभवानी विद्यालयात संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात आले होते. त्यात त्याला कोणताही त्रास जाणवला नाही. हा कालावधी संपल्यानंतर 29 मे रोजी त्याची साखर वाढल्याने त्रास जाणवू लागला.शरीरातील साखरेचे प्रमाण तपासण्यासाठी तो गावातील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात गेला असता, त्याला मायणी येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवण्यात आले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्याने या कर्मचाऱ्याला सातारा येथे घशातील स्रावाचे नमुने तपासणीसाठी पाठवले. त्याचा करोनाचा अहवाल काल (दि. 30 मे) रात्री उशिरा पॉझिटिव्ह आल्याने परिसरात घबराट पसरली आहे. त्यानंतर त्याची पत्नी (वय 52) व अनुक्रमे 22 व 25) वर्षे वयाची दोन मुले व एका मुलाचा मित्र, अशा चौघांना हाय रिस्क कॉन्टॅक्ट म्हणून मायणी मेडिकल कॉलेजमध्ये संस्थांत्मक विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. प्रशासनाने पाचवड, विखळे, औतडवाडी हे रस्ते सील करून मुळीकवाडी फाट्यावर चेकपोस्ट उभी केली आहे.