नवी दिल्ली – पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य यांची कन्या सुचेतना भट्टाचार्य यांनी लिंग बदलाचे ऑपरेशन करण्याचा निर्णय घेतला आहे. लिंग बदलाचे ऑपरेशन केल्यानंतर त्यांची ओळख सुचेतन अशी होणार आहे. या लिंग बदलाच्या शस्त्रक्रियेसाठी आवश्यक असणाऱ्या सर्व प्रक्रिया आणि प्रमाणपत्रांसाठी त्यांनी कायदेशीर सल्ला घेतला असून याबाबत मानसोपचार तज्ज्ञांशीही त्यांनी संपर्क साधला आहे.
एका वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, सुचेतना यांनी अलिकडेच एका एलजीबीटीक्यू कार्यशाळेत हजेरी लावली होती. त्यांनी स्वतःची ओळख पुरुष म्हणून केली आणि हीच ओळख त्यांना आता शारीरिकदृष्ट्याही करायची आहे, म्हणून त्यांनी लिंग बदलाचा निर्णय घेतला आहे.
एलजीबीटीक्यू चळवळीचा एक भाग म्हणून मी ही शस्त्रक्रिया करत आहे. ट्रान्स मॅन म्हणून होणारा सामाजिक छळ मला थांबवायचा आहे, असेही त्या म्हणाल्या. मी एक प्रौढ व्यक्ती आहे. माझं वय आता 41 वर्षे आहे. मी माझ्या आयुष्याशी संदर्भातील माझे निर्णय घेऊ शकते. त्यामुळे कृपया माझ्या पालकांना यात ओढू नका असे आवाहनही त्यांनी केले आहे. मी स्वतःला मानसिकदृष्ट्या पुरुष समजते. त्यामुळे शरीरानेही मला आता पुरुष व्हायचे आहे. एवढंच नव्हे तर, या निर्णयाला वडिलही समर्थन देतील, असा त्यांना विश्वास आहे.
मी हा निर्णय घेतला आहे. मी लढेन. माझ्यात ती हिंमत आहे. कोण काय म्हणतो याची मला पर्वा नाही. प्रत्येकाच्या प्रश्नांची उत्तरे द्यायला मी तयार आहे. हा माझा एकटीचा निर्णय आहे. त्यामुळे या बातमीचा विपर्यास कोणी करू नये.मानसिकदृष्ट्या मी एक ट्रान्स मॅन आहे आणि शरीरानेसुद्धा मला तसेच व्हायचे आहे.
– सुचेतना भट्टाचार्य