नवी दिल्ली -ओडिशाचे माजी मुख्यमंत्री गिरीधर गमांग लवकरच कॉंग्रेसमध्ये परतण्याची शक्यता आहे. त्या राज्यात पुढील वर्षी लोकसभेबरोबरच विधानसभा निवडणुका होतील. तो राजकीय रणसंग्राम विचारात घेता गमांग यांच्या घरवापसीमुळे कॉंग्रेसचे मनोधैर्य उंचावण्यास हातभार लागेल.
ओडिशामधील महत्वाचे आदिवासी नेते असणारे गमांग आणि त्यांचे पुत्र शिशिर यांनी नुकतीच कॉंग्रेस प्रभारी ए.चेल्लाकुमार यांची भेट घेतली. तेव्हापासून त्यांच्या स्वगृही परतण्याच्या चर्चांना उधाण आले. आता गमांग आणि माजी खासदार जयराम पांगी यांचा लवकरच कॉंग्रेस प्रवेश होणार असल्याची माहिती त्या पक्षाच्या सुत्रांकडून देण्यात आली. गमांग यांनी काही वर्षांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला.
त्यानंतर काही महिन्यांपूर्वीच त्या पक्षाला रामराम ठोकून त्यांनी भारत राष्ट्र समितीमध्ये प्रवेश केला. मात्र, तेलंगणाचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांच्या नेतृत्वाखालील त्या पक्षाची सध्या तरी ओडिशात सक्रिय होण्याची योजना दिसत नाही. त्यामुळे गमांग यांनी कॉंग्रेसमध्ये फेरप्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचे समजते.
ओडिशातील सत्तारूढ बिजू जनता दलाला सोडचिठ्ठी देऊन पांगी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. आता तेही कॉंग्रेसच्या वाटेवर असल्याचे सांगण्यात येत आहे.