मुंबई – मुंबई महापालिकेच्या कोविड सेंटर घोटाळाप्रकरणी गुरुवारी सलग दुसऱ्या दिवशी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मुंबईत छापेमारी केली. ईडीच्या पथकाने सकाळी मुंबई महापालिकेचे तत्कालीन वैद्यकीय अधिकारी हरीश राठोड आणि तत्कालीन उपायुक्त रमाकांत बिरादार यांच्या निवासस्थानी धाड मारली.
ईडीचे अधिकारी सध्या दोन्ही अधिकाऱ्यांची विचारपूस करत असल्याची माहिती आहे. दोघांच्याही घरात कसून चौकशी केली जात असून प्रत्येक कागदपत्रांची छाननी केली जात आहे. तसेच, या दोन्ही अधिकाऱ्यांच्या घराबाहेर मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. कुणालाही घरात येऊ दिले जात नाहीये.
दरम्यान, काल ठाकरेंचे निकटवर्तीय असलेल्या कंत्राटदारांसह तत्कालीन अधिकाऱ्यांच्या ठिकाणांवरही ईडीने छापे टाकले. यात आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय सूरज चव्हाण, खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजित पाटकर, संजय शहा, नितीन गुरव यांच्यासह मुंबई मनपाचे तत्कालीन अतिरिक्त आयुक्त व आताचे म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जैस्वाल यांच्याशी संबंधित 15 ठिकाणांची झडती घेण्यात आली.
सूरज चव्हाण यांच्या घरातून ईडीचे पथक तर रात्री दीड वाजतात बाहेर पडले. सकाळी आठवाजेच्या सुमारास ईडीचे पथक सूरज चव्हाण यांच्या घरी धडकले होते. त्यामुळे कोविड सेंटर घोटाळाप्रकरणी ईडीच्या तपासाने आता वेग घेतल्याचे दिसत असून ईडी आणखी काही पालिका अधिकाऱ्यांची चौकशी करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.