हसन (कर्नाटक) – भाजपचे दक्षिणेतील एक ज्येष्ठ नेते आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री डीव्ही सदानंद गौडा यांनी जाहीर केले की त्यांनी निवडणुकीच्या राजकारणातून संन्यास घेण्याचा निर्णय घेतला आहे. बेंगळुरू उत्तरचे लोकसभा सदस्य आणि माजी केंद्रीय मंत्री राहिलेल्या गौडा यांच्या या घोषणेचा विचार आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केला जात आहे.
गौडा पुन्हा एकदा भाजपचे प्रदेशाध्यक्ष होणार का, असे विचारले असता ते म्हणाले, मी निवडणुकीच्या राजकारणातून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. 30 वर्षांपासून माझ्या पक्षाने मला सर्व काही दिले आहे. भाजपचे दिग्गज नेते आणि माजी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांच्यानंतर मी पक्षात सर्वात मोठा लाभार्थी ठरलो आहे.
गौडा यांनी जुलै 2021 मध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला. नरेंद्र मोदी सरकारमध्ये रसायन आणि खते मंत्री असण्यासोबतच गौडा यांनी रेल्वे, कायदा आणि सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी यांसारखी खातीही सांभाळली आहेत.