नवी दिल्ली :- दुहेरी हत्याकांड प्रकरणात आरजेडीचे माजी खासदार प्रभुनाथ सिंह यांना दोषी ठरवित सर्वोच्च न्यायालयाने मोठा झटका दिला आहे. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने कनिष्ठ न्यायालय आणि पाटणा उच्च न्यायालयाचा निर्दोष मुक्तता देणारा निकाल रद्द केला आहे.
बिहारच्या महाराजगंज लोकसभा मतदारसंघातून तीन वेळा जेडीयूचे खासदार आणि एकदा आरजेडीच्या तिकीटावर असलेले प्रभुनाथ सिंह यांच्यावर 1995मध्ये मसरख येथील मतदान केंद्राजवळ 47 वर्षीय दरोगा राय आणि 18 वर्षीय राजेंद्र राय यांची हत्या केल्याचा आरोप होता.
दोघांनी प्रभुनाथ सिंह यांनी पाठिंबा दिलेल्या उमेदवाराला मतदान केले नाही. त्यामुळे त्यांची हत्या करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणी कनिष्ठ न्यायालयाने त्यांना निर्देष मुक्त केले होते. यानंतर पाटणा उच्च न्यायालयानेही हा निर्णय कायम ठेवला होता.
मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या तीन सदस्यीय खंडपीठाने प्रभुनाथ सिंह यांना दोषी ठरविले आहे. तसेच आजच्या सुनावणीत बिहारचे मुख्य सचिव आणि डीजीपी यांना हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
प्रभुनाथ सिंह सध्या दुसऱ्या एका खुनाच्या गुन्ह्यात कारागृहात शिक्षा भोगत आहे. 1995च्या निवडणुकीत प्रभुनाथ सिंह यांच्या सूचनेनुसार मतदान न केल्याने, छपरा येथील मसरख येथील राजेंद्र राय आणि दरोगा राय यांच्या हत्येप्रकरणी दोषी ठरलेल्या माजी खासदारांच्या शिक्षेवरील चर्चेसाठी सर्वोच्च न्यायालयाने 1 सप्टेंबरची तारीख निश्चित केली आहे.