कुपवाडा :- उत्तर काश्मीरच्या कुपवाडामध्ये सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले आहे. येथे शोध मोहिमेदरम्यान सुरक्षा दलांनी मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त केला आहे.
गुप्तचर संस्थांकडून मिळालेल्या माहितीवर कारवाई करत, लष्कर, बीएसएफ आणि पोलिसांच्या संयुक्त पथकाने 15 ते 18 ऑगस्ट दरम्यान कुपवाडाच्या माछिल सेक्टरमध्ये मोठ्या प्रमाणावर शोध मोहीम सुरू केली.
शोध मोहिमेदरम्यान मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. त्यामध्ये पाच एके रायफल्स, सात पिस्तुले, चार हातबॉम्ब आणि इतर गुन्हेगारी साहित्य जप्त करण्यात आले. सुरक्षा दलांनी आजूबाजूच्या परिसराला वेढा घातला आहे. येथे शोधमोहीम अजूनही सुरू आहे.
दुसरीकडे, खोऱ्यातील सोपोर जिल्ह्यात पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. पोलिसांनी लष्कर-ए-तैयबाच्या दोन ओजीडब्ल्यूएस (ओव्हर ग्राउंड वर्कर) यांना अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातून पिस्तूल आणि ग्रेनेडच्या आठ राउंड जप्त करण्यात आले आहेत. याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. दहशतवाद्यांच्या मदतनीसांची चौकशी केली जात आहे.