“अहंकार आणि राजकारण विसरून ‘महाराष्ट्र मॉडेल’ लागू करा”; संजय राऊतांचा केंद्रावर निशाणा

मुंबई: देशात पंतप्रधान आहेत. केंद्रीय गृहमंत्री आहेत. पण ते गायब आहेत. त्यामुळे देश रामभरोसे चालला आहे, असं सांगतानाच अहंकार बाजूला ठेवून देशात महाराष्ट्र मॉडेल लागू करा, अशी मागणी शिवसेना नेते संजय राऊत यांनी केली आहे. संजय राऊत यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना पुन्हा एकदा केंद्र सरकारवर टीका केली. या देशात सरकार आहे. प्रशासन आहे. पंतप्रधान आहेत. आरोग्य मंत्रीही आहेत. पंतप्रधान जागेवरच आहेत. पण त्यांचे अस्तित्व दिसणं महत्त्वाचं आहे. त्यांनी अदृश्य होऊन चालणार नाही, असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.

गंगा-यमुना नदीत प्रेत सापडत आहेत. नद्यांमध्ये प्रेतांचा खच दिसून येत आहे. मृतदेहांवर व्यवस्थित अंत्यसंस्कारही करता येत नाही. या पूर्वी या देशात असं कधीच झालं नव्हतं. देशात नुसता हाहाकार माजला आहे. प्रभू श्रीरामाच्या अयोध्येत ऑक्सिजन अभावी लोक मरत आहेत. अहंकार आणि राजकारण विसरून जर बोलणी केली तर देश पुढे जाईल, असे ते म्हणाले.

महाराष्ट्रात नेहमीच उत्तम काम झालं आहे. त्यांना बदनाम करण्याचे कामही नेहमीच झाले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली देशात महाराष्ट्राने उत्तम काम केलं आहे. केंद्र सरकार, पंतप्रधान आणि देशाच्या आरोग्य मंत्र्यांनी कोणताही अहंकार न बाळगता महाराष्ट्र मॉडेल देशात लागू करायला हवं होतं, असं राऊत म्हणाले. कोरोनाचा संसर्ग वरखाली होत आहे. पण कोरोनावर नियंत्रण मिळविण्याचे काम महाराष्ट्राने उत्तम प्रकारे केले आहे. त्याचे कौतुक देशात नव्हे तर जगभरात सुरू आहे, असेही ते म्हणाले.

सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. देशातील प्रमुख विरोधी पक्षांनी या संदर्भात पत्रं लिहिलं आहे. सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाचा पैसा कोरोनासाठी वापरण्यात यावा. दिल्लीचा नक्शा बदलून काय करणार? लोक जगण्यासाठी संघर्ष करत आहेत, असा सवाल त्यांनी केला. बंगाल निवडणुकीवरून त्यांनी पुन्हा एकदा निवडणूक आयोगावर निशाणा साधला आहे. मला वाटतं कोरोना पसरण्यामागे निवडणूक आयोग सर्वात मोठा गुन्हेगार आहे. आठ टप्प्यांमध्ये निवडणूक खेचण्याची काहीच गरज नव्हती. त्यात राजकारण होतं. त्यामुळे कोरोना संक्रमणाला ताकद मिळाली. हे देशाचं दुर्भाग्य आहे, असे ते म्हणाले. त्यांनी इस्रायलवादावरही प्रतिक्रिया व्यक्त केली. इस्रायल वाद हा आताचा नाही. भारत आणि पाकिस्तान प्रमाणेच त्यांचं आहे, असे ते म्हणाले.

जलसंपदा मंत्री जयंत पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष आहेत. ते महाविकासआघाडी मधील महत्त्वाचे मंत्री आहेत. अनुभवी नेते आहेत. त्यांनी काल स्वतः पत्रकार परिषद घेऊन त्याबाबत खुलासा केलाय जो अत्यंत महत्वाचा आहे. कॅबिनेटमध्ये काय घडलं? याबाबत बाहेर सांगू शकत नाही. चर्चा झाली असेल काही, असं सांगतानाच कितीही कोणीही अफवा पसरविल्या तरी महाविकास आघाडी सरकार हे स्थिर आहे मजबूत आहे. कॅबिनेटमध्ये भांड्याला भांडे लागले असेल पण आमची भांडी काचेची नाही. ती फुटणार नाही किंवा त्याला तडा जाणार नाही. हमारे घर शीशे के नही है, कोई भी पत्थर मारे और टूट जाये, असे ते म्हणाले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.