जगातील सर्वात मोठी अर्थसत्ता आणि महासत्ता असलेल्या अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात जी पोलीस कारवाई सुरू झाली आहे त्यानंतर अमेरिकेच्या राजकारणात पडसाद उमटणे साहजिकच आहे. जगाच्या पाठीवरील इतर अनेक देशांमध्ये जरी माजी पंतप्रधान किंवा माजी अध्यक्ष यांच्यावर होणाऱ्या कारवाईच्या घटना सतत घडत असल्या तरी अमेरिकेसारख्या देशामध्ये माजी राष्ट्राध्यक्षांवर पोलीस कारवाई होण्याची ही पहिलीच घटना. त्यामुळे निश्चितच त्याला महत्त्व आहे. अमेरिकेच्या राजकीय इतिहासातील सर्वात वादग्रस्त अध्यक्ष म्हणून ज्यांच्यावर शिक्का बसला आहे त्या डोनाल्ड ट्रम्प यांच्याबाबत ही घटना घडत असल्याने त्याला अधिकच जास्त महत्त्व आहे.
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक पुढील वर्षी होणार आहे आणि ही निवडणूक पुन्हा एकदा लढण्याच्या तयारीत असलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांना या फौजदारी कारवाईच्या निमित्ताने एक धक्का देण्याचे काम तेथील विद्यमान अमेरिकन प्रशासनाने केले आहे, हे उघड आहे. जगातील विविध लोकशाही व्यवस्थांचा विचार करता भारताच्या खालोखाल सर्वात मोठी लोकशाही व्यवस्था म्हणून अमेरिकेचा उल्लेख केला जातो; पण भारताच्या तुलनेत अमेरिकेतील लोकशाही व्यवहार आणि निवडणुकीचे राजकारण काहीसे वेगळे आहे. भारत असो किंवा जगातील इतर कोणताही लोकशाही देश असो त्या ठिकाणी एखाद्या माजी राष्ट्रप्रमुखावर कारवाई सुरू झाल्यावर ज्या प्रकारचे पडसाद उमटतात तशा प्रकारची प्रतिक्रिया अमेरिकेतील सामान्य नागरिकांकडून अपेक्षित नसली, तरी पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकीवर मात्र या सर्व घडामोडींचा परिणाम होणे अपरिहार्य आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी जेव्हा 2020 मध्ये निवडणूक लढवली होती तेव्हा डेमोक्रॅटिक पक्षाचे बायडेन यांनी त्यांचा पराभव केला होता. त्यापूर्वी 2016 मध्ये झालेल्या निवडणुकीत हिलरी क्लिंटन यांचा पराभव करून अगदी अनपेक्षितपणे डोनाल्ड ट्रम्प अध्यक्षपदावर विराजमान झाले होते. सुरुवातीच्या दिवसापासूनच ट्रम्प यांची कारकीर्द वादग्रस्त ठरली होती. अमेरिकेच्या राजकारणाने आतापर्यंत कधीही एवढ्या अतिरेकी उजव्या विचाराचा अध्यक्ष पाहिला नव्हता. त्यानंतर चार वर्षांनी झालेल्या निवडणुकीमध्ये मतदारांनी डोनाल्ड ट्रम्प यांना संधी दिली नाही. पण आता पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकीमध्ये डोनाल्ड ट्रम्प मोठ्या तयारीने उतरणार असल्यानेच या सर्व पोलीस कारवाई प्रक्रियेचा त्यांच्या या तयारीला निश्चितच फटका बसणार आहे. ट्रम्प यांच्यावर जे आरोप ठेवण्यात आले आहेत ते त्यांना ऐकवण्यासाठी दोन दिवसांपूर्वी ते न्यायालयात हजर झाले.
आता या प्रकरणाची सुनावणी पुढील वर्षीच म्हणजे जानेवारी 2024 मध्ये होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. म्हणजेच पुढील वर्षी होणाऱ्या अध्यक्षपद निवडणुकीच्या काळातच या सर्व घडामोडींना वेग येणार आहे. ट्रम्प यांच्यावर जे आरोप ठेवण्यात आले ते निश्चितच गंभीर स्वरूपाचे आहेत. अमेरिकेचे आणखी एक माजी अध्यक्ष बिल क्लिंटन यांचे त्यांच्या मैत्रिणीसोबत असलेल्या संबंधाचे “मोनिका लेवेन्स्की प्रकरण’ खूप गाजले होते. पण तो सगळा विषय पूर्णपणे वैयक्तिक असल्याने त्यात पोलीस कारवाईचा विषय नव्हता. मात्र, डोनाल्ड ट्रम्प यांनी ज्या प्रकारे 2016 मध्ये निवडणुकीपूर्वी काही अनैतिक गोष्टी दडपून टाकण्यासाठी काही लोकांना लाच देण्याचे प्रकार केले होते, ते समोर आल्यानेच या सर्व कारवाईला सुरुवात झाली आहे. पोर्नोग्राफी फिल्ममध्ये काम करणाऱ्या एका अमेरिकन पॉर्नस्टारला गप्प बसण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांनी तब्बल एक लाख तीस हजार डॉलरची लाच दिली होती, हा विषय या निमित्ताने समोर आला आहे. निवडणूक काळामध्ये प्रचार सुरू असताना माहिती लपवणे आणि अनैतिक मार्गाचा वापर करून एखादी गोष्ट समोर येऊ न देणे या आरोपाखाली आता डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर ही कारवाई सुरू करण्यात आली आहे.
अमेरिकन कायद्याखाली हे सर्व फौजदारी विषय असल्यामुळेच ट्रम्प यांना प्रत्यक्ष न्यायालयात हजर राहून आपल्यावर कोणते आरोप ठेवण्यात आले हे ऐकून घ्यावे लागले. कोणत्याही माजी राष्ट्रप्रमुखाबाबत जेव्हा असे कारवाईचे प्रसंग घडतात तेव्हा त्यामागे कोणते ना कोणते राजकारण आहे अशा प्रकारची विरोधी भूमिका नेहमीच घेतली जाते. डोनाल्ड ट्रम्पही त्यास अपवाद नाहीत. अमेरिकेची वाटचाल नरकाच्या दिशेने सुरू आहे, अशा प्रकारचे जे एक विधान त्यांनी केले आहे ते त्यांच्या या विरोधी भूमिकेचे उदाहरण मानावे लागेल. डोनाल्ड ट्रम्प यांची अध्यक्षपदाची कारकीर्द असो किंवा अध्यक्षपद निवडणूक हरल्यानंतर त्यांनी केलेले काही कृत्ये असो, त्यांच्याबाबत कधीच अमेरिकेतील जनतेला सहानुभूती वाटेल, असे दिसत नाही. गेल्या निवडणुकीत हरल्यानंतर ज्याप्रकारे अमेरिकन संसद भवनाबाहेर लोकांनी गर्दी केली होती आणि संसद भवनवर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला होता या सर्व घटनेला डोनाल्ड ट्रम्प यांची चिथावणी कारणीभूत होती, असेही मानण्यात येते.
डोनाल्ड ट्रम्प यांचा राजकीय इतिहासही फारसा भूषणावह आणि सकारात्मक नसल्याने या सर्व घडामोडींची दिशा निश्चित काय असणार आहे हे नजीकच्या कालावधीमध्ये ठरणार आहे. पुढील वर्षी होणारी अमेरिकन अध्यक्षपदाची निवडणूक कोणत्याही परिस्थितीत जिंकायची या ईर्ष्येने निवडणुकीची तयारी आतापासूनच सुरू केलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांच्या या नियोजनाला थोडाफार ब्रेक लावण्याचे काम ही सर्व फौजदारी कारवाई निश्चितपणे करणार आहे. या सर्व घडामोडींचा सकारात्मक फायदा डोनाल्ड ट्रम्प यांना होतो का, त्यांच्या कारकिर्दीवर याचा नकारात्मक परिणाम होतो का, हेसुद्धा पाहावे लागणार आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर अन्याय होत आहे अशी भावना जर अमेरिकन मतदारांच्या मनात निर्माण झाली असेल, तर त्यांना आगामी निवडणुकीमध्ये निश्चितच त्याचा फायदा मिळू शकतो. पण डोनाल्ड ट्रम्प यांची चूक झाली आहे आणि त्यांनी गुन्हा केला आहे असे जर सर्वसामान्य मतदाराला वाटले तर त्याचा मोठा फटका ट्रम्प यांना निवडणुकीत बसू शकतो.