पुणे – महापालिकेच्या तब्बल 2955 कोटींच्या ठेवी बॅंकासह, शासकीय रोख्यांमध्ये गुंतविलेले असतानाही महापालिकेकडून 2023-24 च्या अंदाजपत्रकात सुमारे 400 कोटींचे कर्जरोखे प्रस्तावित केले आहे. त्यामुळे प्रशासनाने हे कर्जरोखे काढून त्यावर व्याज भरण्यापेक्षा अल्प व्याजदराने असलेल्या ठेवी मोडून खर्च करावा अथवा ठेवींवरच बॅंकाकडून अल्प व्याजदराने कर्ज काढावे, अशी मागणी सजग नागरिक मंचाने महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे केली आहे.
चार बॅंकांमध्ये 2200 कोटींच्या ठेवी
महापालिकेच्या शहरातील चार राष्ट्रीयकृत बॅंकांमध्ये तब्बल 2200 कोटींच्या ठेवी आहेत. याशिवाय शासकीय रोख्यांमध्ये महापालिकेने सुमारे 775 कोटी रुपये गुंतवलेले असून, या सर्व गुंतवणुकीतून प्रशासनाने 2023-24 या अंदाजपत्रकात तब्बल 110 कोटी व्याजाचे उत्पन्न प्रस्तावित केले आहे. तर या ठेवींमधील जवळपास 1100 कोटींच्या ठेवींवर पालिकेस साडेपाच ते साडेसहा टक्के व्याज मिळत आहे. मात्र, त्याच वेळी बाजारात कर्जरोख्यांचे व्याज तब्बल नऊ ते साडेनऊ टक्के आहे. त्यामुळे बॅंकांमध्ये जवळपास 1100 कोटींच्या ठेवी अल्प व्याजदराने असताना महापालिका जास्त व्याज असलेले कर्ज काढत आहे. याशिवाय हे कर्जरोखे काढण्यासाठी स्टॅम्प ड्यूटी, सेबी फी, जाहिराती यावर दीड दोन कोटी रुपये खर्च होणार आहेत. यामुळे पालिकेने या ठेवींचा वापर करावा अथवा या ठेवींवर बॅंकाकडून कर्ज काढावे, त्याचे व्याजदर कमी असणार असल्याने पालिकेचे आर्थिक नुकसानही होणार नाही.
“जायका’साठी काढणार कर्ज
महापालिका प्रशासनाकडून शहरातील नदीसंवर्धनासाठी जपानमधील जायका कंपनीच्या माध्यमातून मुळा-मुठा नदी संवर्धन प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पासाठी सुमारे 981 कोटींचा खर्च अपेक्षित होता. मात्र, केंद्र शासनाने 2015 मध्ये मान्यता दिल्यानंतरही पाच वर्षे या प्रकल्पास उशीर झाल्याने या प्रकल्पाचा खर्च 500 कोटींनी वाढला आहे. त्यातच आता महापालिकेत नवीन 34 गावे समाविष्ट झाल्याने या गावांच्या सांडपाण्यासाठीही हा प्रकल्प राबविला जाणार आहे. त्यासाठी जायका कंपनीकडून कर्ज घेण्यासह बाजारातून महापालिका आणि 400 कोटींचे कर्जरोखे घेणार आहे.
महापालिकेच्या सुमारे तीन हजार कोटींच्या ठेवी बॅंकेत पडून आहेत. त्यानंतरही पालिकेस कर्ज का काढायचे हे अनाकलनीय आहे. कर्ज काढायची एवढीच हौस असेल तर ठेवींच्या आधारे कमी व्याजदरात बॅंकाच कर्ज देतात या पर्यायाचा विचार करावा अशी आमची मागणी आहे.
– विवेक वेलणकर, अध्यक्ष, सजग नागरिक मंच पुणे.