पुणे – महापालिकेच्या फुरसुंगी आणि देवाची उरूळी येथील कचरा डेपोची व तेथील प्रक्रिया प्रकल्पांची आफ्रिका तसेच आशिया खंडातील 18 विविध देशांच्या प्रतिनिधींनी बुधवारी पाहणी केली. यावेळी, महापालिकेकडून शहरातील कचरा समस्येवर कॅपिंगच्या माध्यमातून काढलेला यशस्वी प्रयोगाचे या प्रतिनिधींनी विशेष कौतुक केले. तसेच यावेळी या प्रतिनिधींनी या ठिकाणी वृक्षारोपनही केले.
अफ्रिका खंडातील देशांसह आशियामधील बांग्लादेश, नेपाळ, श्रीलंका आणि भूतानच्या प्रतिनिधींही या शिष्टमंडळात असून केंद्रशासनाच्या सूचनेनुसार, हा पाहणी दौरा आयोजित करण्यात आला होता. तर, त्यात महापालिकेकडून राबविण्यात येत असलेल्या कचरा प्रकल्पांसाठी विशेष दौऱ्यांचे आयोजन केले जात आहे.
कचरा डेपो येथील हा प्रकल्प भूमीग्रीन एनर्जी या कंपनीच्या माध्यमातून राबविला जात आहे. दरम्यान,या प्रतिनिधींनी शहरातील काही घरांमध्ये जाऊन ओला व सुका कचरा गोळा करणे, त्याची प्रक्रिया प्रकल्पांपर्यंत वाहतूक, तसेच प्रत्यक्ष प्रक्रिया प्रकल्प आणि जुन्या साठलेल्या कचऱ्यावरील बायोमायनिंग प्रक्रिया, या प्रकल्पांमधून होणारी सेंद्रीय खत निर्मितीची माहिती घेतली.