लखनौ -लखनौ सुपर जायंट्स व चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातील बुधवारचा सामना पावसाच्या व्यत्ययाने वाया गेला. या सामन्यात लखनौने 19.2 षटकांत 7 बाद 125 अशी वाटचाल केली होती. मात्र, पुन्हा एकदा पावसाला प्रारंभ झाला. पंचांनी वारंवार पाहणी करून पुढे सामना होऊ शकणार नसल्याचे जाहीर केले व दोन्ही संघांना प्रत्येकी 1 गुण बहाल करण्यात आला.
चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने नाणेफेक जिंकत ढगाळ वातावरणामुळे गोलंदाजांना सुरुवातीला लाभ होईल हे लक्षात घेत लखनौला पहिल्यांदा फलंदाजी दिली. त्याचा हा निर्णय सार्थ ठरवताना महिशा तक्षिणा, मोईन अली व रवींद्र जडेजा यांनी अफलातून गोलंदाजी करत लखनौची स्थिती एकवेळ 5 बाद 44 अशी बिकट केली. मनन व्होरा, केल मायर्स, कर्ण शर्मा, कर्णधार कृणाल पंड्या व मार्कस स्टोनिस यांनी साफ निराशा केली. या स्थितीतून लखनौचा डाव सावरताना निकोलस पूरनने आयुष बदोनीला साथ देत संघाचे अर्धशतक फलकावर लावले. या जोडीने
सहाव्या गड्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण 59 धावांची भागीदारी केली व संघाचे शतक पूर्ण केले. पूरन रंगात आलेला असतानाच 31 चेंडूत 20 धावांवर बाद झाला. दरम्यान बदोनीने आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याला साथ देण्यासाठी आलेला व यंदाच्या स्पर्धेत भरात असलेला कृष्णाप्पा गौतमही अपयशी ठरला. यावेळी लखनौच्या डावातील अखेरचे षटक सुरू होते.
अखेरचे चार चेंडू बाकी असताना पावसाला प्रारंभ झाला व सामना थांबवावा लागला. यावेळी लखनौच्या 7 बाद 125 धावा झाल्या होत्या. बदोनी 33 चेंडूत 2 चौकार व 4 षटकारांच्या मदतीने 59 धावांवर नाबाद होता. चेन्नईकडून मोईन अली, मथिशा पथिरना व महिशा तक्षिणा यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. रवींद्र जडेजाने 1 बळी घेतला.
धोनीने घेतली मॉरिसनचीच फिरकी
या सामन्याला प्रारंभ होण्यापूर्वी नाणेफेक झाल्यावर चेन्नईचा कर्णधार धोनीने पुन्हा एकदा यंदाच्या आयपीएल स्पर्धेनंतर निवृत्त होण्याबाबतचे संकेत दिले. नाणेफेक समालोचक डॅनी मॉरिसन यांनी मैदानावर तुझे पाठीराखे खूप मोठ्या संख्येने आले आहेत, असे सांगितल्यावर धोनी हसला व ते मला निरोप देण्यासाठी तर आले नाहीत ना, असा उलट सवाल केला. मात्र, केवळ माझ्या चाहत्यांनीच नव्हे तर तुम्ही सगळ्यांनीच माझी ही अखेरची स्पर्धा असल्याचे ठरवूनच टाकले आहे का, असा सवाल करत मॉरिसनचीच फिरकी घेतली.