rain news – दक्षिण कोकणात वीजा आणि जोराचे वारे यांच्यासह तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस (rain) पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. अन्यत्र हवामान कोरडे राहणार असल्याचाही अंदाज आहे. महाराष्ट्रासह देशातही विविध ठिकाणी आज पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे.
देशातील अनेक राज्यातून मान्सून माघारी गेला असला तरी येत्या 24 तासांत राज्यासह विविध ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
महाराष्ट्रात कोल्हापूर, कोकण किनारपट्टी या भागांमध्ये पुढील 24 तासांत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, 18 ऑक्टोबरपर्यंत अनेक राज्यांमध्ये पावसाची शक्यता असून, त्यानंतर राज्यात थंडीचा कडाका सुरू होण्याची शक्यता आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात विजांसह वादळी पावसाचा इशारा हवामान विभागाच्या वतीने देण्यात आला आहे. तर विजांसह पावसाची शक्यता रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, जळगाव, नाशिक, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यात होण्याचा अंदाज हवामान विभागने व्यक्त केला आहे. पावसाला पोषक हवामान तयार झाल्याने आज कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे.
तळ कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात ताशी 40 किलोमीटर वेगाने वारे वाहून विजांसह वादळी पावसाचा इशारा आहे. तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.