पुणे – शिक्षण व अध्यात्माचा अंगीकार करून विश्वशांतीसाठी आपले जीवन समर्पित करणारे विश्वधर्मी डॉ. विश्वनाथ कराड हे एकमेवाद्वितीय व्यक्ती आहेत. “वसुधैव कुटुंबकम्’ आणि “एकम् सत विप्रा बहुधा वदंती’ या तत्त्वांचे पालन केले आहे. त्यांच्या प्रेरणेने संपूर्ण समाज शांततेच्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न करेल. त्यांचे विचार प्रत्येक व्यक्तीला शांतीच्या दिशेने घेऊन जातील. घुमट पाहण्यासाठी येणाऱ्या प्रत्येकासाठी हा पुतळा प्रेरणादायी ठरेल, अशी भावना यूएसए येथील स्पॅन कन्स्ट्रक्शन अँड इंजिनिअरिगचे अध्यक्ष आणि सीईओ किंग हुसेन यांनी व्यक्त केली.
शिक्षक दिनानिमित्त प्रा. डॉ. विश्वनाथ कराड यांच्या ब्रॉंझच्या पुतळ्याचे अनावरण राजबाग, लोणी काळभोर येथे सर्व धर्मगुरुंच्या उपस्थितीत झाले. यावेळी डी.जे. बॉडन आणि यूएसए येथील मायक्रोलिन एलएलसीचे संस्थापक डॉ. अशोक जोशी, डेव्हिड हंसमन, रोनाल्ड गेल, डॉ. रामविलास वेदांती, महंत रामदास, राहुल भन्ते बोधी, आयझॅक मळेकर, डॉ. लेसन आझादी, आचार्य लोकेश मुनी, एडिसन सामराज, मेहर मास्टर मूस, सईद अजीज निजामी, मौलाना अंसारी आणि ब्रह्माकुमारी नीलिमा दीदी यांची प्रमुख उपस्थिती होती. एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. विश्वनाथ कराड, कार्याध्यक्ष राहुल कराड आणि डॉ. मंगेश कराड उपस्थित होते.
शिक्षक दिनानिमित्त डॉ. विश्वनाथ कराड यांचा पगडी, घोंगडी, सार्थ ज्ञानेश्वरी ग्रंथ आणि वीणा देऊन विशेष सन्मान करण्यात आला.
डॉ. विश्वनाथ कराड म्हणाले, “मी आज माझे विचार शब्दांत व्यक्त करू शकत नाही. जीवनाचा उद्देश काय आहे, पुढे काय करायचे, शिक्षणाची नवीन संकल्पना काय असेल हे समजून घेणे महत्वाचे आहे.’
जैन धर्मियांतर्फे होणार सन्मान
आचार्य लोकेश मुनी म्हणाले, “या घुमटात जी-20 सुरू होणे ही शाश्वत विकासाची पहिली पायरी आहे. डॉ. कराड यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना जैन धर्माच्या वतीने 2023 या वर्षीच्या अहिंसा आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.’