पिंपरी – पिंपरी चिंचवड शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव 2023 या कालावधीसाठी सार्वजनिक ठिकाणी तात्पुरत्या स्वरुपात उभारणी केलेले मंडप, स्टेज, कमान यांचे परवाना शुल्क माफ करण्याचा निर्णय पिंपरी चिंचवड महापालिकेने घेतला असून तसा आदेश महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी निर्गमित केला असून या विशयी माजी उपमहापौर शैलजा अविनाश मोरे व सिंधूनगर युवक मित्र मंडळ कार्याध्यक्ष अरुण थोरात यांनी केलेल्या या मागणीला यश आले आहे. तर, सन 2023 सालाकरिता वसूल करण्यात आलेल्या शुल्काची संपूर्ण रक्कम संबंधित मंडळांना परत मिळणार आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत गणेश मंडळांना मंडप भाडे आकारण्यात येऊ नये, असा निर्णय झाला होता. ठाणे महापालिकेत या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली. मात्र, पिंपरी चिंचवड महापालिकेने त्याची अंमलबजावणी कार्यक्षेत्रात केली नव्हती. याबाबत माजी उपमहापौर शैलजा मोरे व सिंधूनगर युवक मित्र मंडळ कार्याध्यक्ष अरुण थोरात यांनी महापालिका प्रशासनाकडे पाठपुरावा करत मंडप शुल्क रद्द करण्याची मागणी त्यांनी केली होती. त्याची दखल महापालिकेने घेतली आहे. त्यामुळे शहरातील गणेश मंडळांना दिलासा मिळाला आहे.
हा सार्वजनिक उत्सव असल्यामुळे कोणतेही शुल्क मंडळांकडून घेऊ नये, अशी मागणी त्यांनी केली होती. त्याबाबत महापालिकेने सकारात्मक निर्णय घेतला आहे. तसा आदेश आयुक्तांनी काढला आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेकडून सन 2022 ते सन 2026 या कालावधीसाठी गणेशउत्सव, नवरात्र उत्सव व सार्वजनिक धार्मिक कार्यवाहीसाठी सार्वजनिक मंडळे यांना मंडप, स्टेज, स्वागत कमान आदींसाठी परवानगी देण्याबाबत परिपत्रक निर्गर्मित करण्यात आले आहे. 2023 सालाकरिता वसूल करण्यात आलेल्या शुल्काची संपूर्ण रक्कम संबंधित मंडळांना परत करण्यात यावी, असे आदेशात आयुक्तांनी म्हटले आहे, अशी माहिती शैलजा मोरे यांनी दिली आहे.