समाजामध्ये आशेचा किरण अबाधित ठेवणे, हे अत्यंत महत्त्वाचे काम हे काही शिक्षक आजही करतात. परंतु आपल्याच देशात अशा दीपस्तंभ असणाऱ्या शिक्षकांना फारसे महत्त्व दिले जात नाही. मात्र, भारतातली हुशार माणसे परदेशांत गेल्यानंतर सर्वोच्च पद भूषवित आहेत. याचे कारण त्या भारतीयांच्या हुशारीला परदेशात मिळालेला प्रतिसाद. म्हणून इंग्लंड, अमेरिका सारख्या प्रगत देशांच्या विद्यापीठांमध्ये भारतीय प्राध्यापकांना महत्त्वाचे मानले जाते.
हे सर्व विवेचन करण्याचे कारण असे, की लातूर जिल्ह्यातील दीड हजार वस्तीच्या रामेश्वर या गावात शेतकरी आणि वारकरी कुटुंबात जन्मलेल्या डॉ. विश्वनाथ कराड या मुलाने गावातील गोठ्यामध्ये भरणाऱ्या शाळेत शिक्षण घेतले. पुढे सोलापूरच्या महाविद्यालयात अभियांत्रिकी शिक्षण घेऊन पुण्यासारख्या सांस्कृतिक राजधानीतील कॉलेज ऑफ इंजिनियरिंगमध्ये 20 वर्षे प्राध्यापकी केली.
आज एमआयटी डब्ल्यूपीयू, लोणी एडीटी युनिव्हर्सिटी, अवंतिका युनिव्हर्सिटी उज्जेैन, शिलॉंगमध्ये युनिव्हर्सिटी आणि सोलापूर शहरात विश्वप्रयाग विद्यापीठ इथपर्यंत केलेला अलौकिक आणि दैवी प्रवास भारतात किती कौतुकाचा आहे माहिती नाही. परंतु परदेशातील लोकांना मात्र याचे आकर्षण वाटले.
अमेरिकेतील विद्यापीठाने डॉ. विश्वनाथ कराड यांच्यासंदर्भात माहिती मिळवली. सोबतच अन्य काही विद्यापीठांनी येथे येऊन पूर्ण माहिती घेतली आणि डॉ. विश्वनाथ कराड यांचे अभिनंदन आणि कौतुक करत एक सन्मानचिन्ह न देता डॉ. विश्वनाथ कराड यांचा पूर्णाकृती ब्रांझचा पुतळा भेट देण्यात आला. डॉ. विश्वनाथ कराड यांच्या शिक्षक या नात्याने केलेल्या कर्तृत्वाला परदेशी विद्यापीठांनी केलेला सलाम आहे.
विद्यार्थीप्रिय शिक्षक म्हणून डॉ. कराड हे सीओईपीमध्ये प्रसिद्ध होते. परंतु एमआयटी ही स्वतःची संस्था स्थापन केल्यानंतर वार्षिक महोत्सावात सर्व विद्यार्थ्यांना जेवण देऊन प्रत्येक विद्यार्थ्यांला अत्यंत प्रेमाने गुलाबजाम भरविणारा शिक्षक माझ्या माहितीत नाही. हे असे विद्यार्थ्यांवर प्रेम करण्यापासून
थर्मोडायनॉमिक्स याविषयातील अत्यंत ज्ञानी शिक्षक म्हणून कराड सरांचा नावलौकिक आहे. डॉ. विश्वनाथ कराड यांचे वय 80च्या पुढे आहे. अलिकडच्या काळात राष्ट्रीय आणि राजकीय पार्श्वभूमी नसलेले काही पुरस्कार सरांना प्रदान करण्यात आले आहेत. तरी परदेशातील या नामांकित विद्यापीठांकडून दिला जाणारा कराड सरांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा सन्मान हा मेरूमणी ठरावा.
हा पूर्ण लेखप्रपंच या पुतळ्याच्या स्थापना सोहळ्याच्या निमित्ताने केला आहे. शिक्षक दिनानिमित्त परदेशातील विद्यापीठांनी भारतीय विविधेच्या प्रांगणात येऊन त्या विद्यापीठाच्या संस्थापकाचा पुतळा स्थापित करून सन्मान करावा हा भारतीयांसाठी आनंदाचा सोहळा आहे.
– डॉ. संजय उपाध्ये,
लेखक, कवी आणि गप्पाष्टककार