पुणे – शहरातील पोलिस ठाण्यात विविध कामांसाठी जाणाऱ्या नागरिकांना चांगल्या सुविधा देणे, तेथे चांगले वातावरण निर्माण करणे, यासाठी पोलिस ठाण्यांचा चेहरामोहरा बदलण्यात येत आहे, अशी माहिती पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी गुरुवारी दिली.
कोंढवा पोलिस ठाण्याच्या सुसज्ज नवीन इमारतीचे लोकार्पण गुप्ता यांच्या हस्ते पार पडले. यावेळी अतिरिक्त आयुक्त नामदेव चव्हाण, उपायुक्त (परिमंडळ पाच) नम्रता पाटील, सहायक आयुक्त राजेंद्र गलांडे, कोंढवा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सरदार पाटील आदी यावेळी उपस्थित होते. ठाण्याची नवीन वास्तू उभारण्यासाठी कोंढवा परिसरातील जहांगीर दोराबजी अमित गडोक, ब्रिजेंद्र कुमार सिंह, परेश राघवानी, किरण देसाई, खुजेन नगरवाला, अबिद सय्यद, नानासाहेब मरळ, स्वप्निल मासाळ, समित शहा, भाऊसाहेब लोखंडे आंदीचे सहकार्य लाभले त्यामुळे त्यांचा यावेळी सन्मान करण्यात आला.
“अलीकडील काळात सहकारनगर, विमानगर पोलिस ठाण्यांचा कायापालट केला. तर, येत्या काळात वाघोली आणि खराडी येथे देखील सीएसआर मधून नवीन वास्तू उभारल्या जात आहेत. काळानुसार सर्व गोष्टी अद्ययावत करणे गरजेचे असते. त्याबरोबरच लोकांच्या मानसिकतेत देखील बदल झाला पाहिजे. त्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत,” असे गुप्ता यावेळी म्हणाले. गुप्ता यांनी इमारतीच्या उद्घाटनानंतर पाहणी केली.
शहर पोलिस दलास पुण्यातील सुजाण नागरिक वेळोवेळी मदतीचा हात पुढे करत असल्याचे त्यांनी त्याच्या भाषणात नमुद केले. सूत्रसंचालन विवेक देव केले. तर, सरदार पाटील यांनी आभार मानले.