पुणे – सूर्यमालेतील सर्वांत मोठे दोन ग्रह असलेले गुरू आणि शनि हे दोन ग्रह एकमेकांच्या अतिशय जवळ येणार आहे. दि.21 डिसेंबर रोजी गुरू आणि शनि हे एकमेकांच्या खूप जवळ दिसणार आहेत. ग्रहांची ही एक ऐतिहासिक महायुती असल्याचे खगोलविश्वातून सांगितले जात आहे.
जेव्हा दोन ग्रह एकमेकांच्या जवळ येतात त्याला त्या ग्रहांची युती म्हणतात. याबाबत मुंबई येथील नेहरू तारांगणचे अरविंद परांजपे म्हणाले, “गुरू हा सूर्याची एक परिक्रमा 11.87 वर्षांनी पूर्ण करतो. तर शनिला 29.5 वर्षे लागतात. या दोन्हींचा परिणाम असा, की दर सुमारे 19 वर्षे आणि 7 महिन्यांनी या ग्रहांची महायुती होते. पण, प्रत्येक महायुतीवेळी यांच्यातील अंतरे वेगवेगळी असतात. दि.21 डिसेंबर रोजी हे दोन्ही ग्रह एकमेकांपासून फक्त 0.1 अंश कोनीय (अर्थात 6 कला आणि 6 विकला) अंतरावर असतील.
तुलनेने चंद्राचा सरासरी कोनीय व्यास हा 0.5 अंश आहे. दुर्बिणीच्या शोधानंतर दुसऱ्यांदा हे ग्रह इतके जवळ दिसणार आहेत. यापूर्वी 16 जुलै 1623 रोजी हे ग्रह जेव्हा इतके जवळ आले, तेव्हा त्यांच्यातील अंतर 0.086 अंश होतं. यापूर्वी 24 ऑक्टोबर 1682 आणि त्यांनंतर लगेच 9 फेब्रुवारी 1683 रोजी यांच्यातील अंतर वशिष्ठ आणि अरुंधती यांच्या अंतरापेक्षा कमी होते. त्यावेळी हे दोन्ही ग्रहांचे वक्री भवन सुरू होते. आता 338 वर्षांनी पहिल्यांदाच हे ग्रह इतके जवळ दिसणार आहेत. या नंतर हे दोन्ही ग्रह इतके जवळ परत 15 मार्च 2080 रोजी येतील.’
आपण काय बघू शकू ?
दि.15 डिसेंबर रोजी सूर्यास्तानंतर सुमारे 30 मिनिटांनी आपल्याला पश्चिम क्षितिजावर बारीक चंद्रकोर दिसण्याची शक्यता आहे. दुसऱ्या दिवशी चंद्रकोर आपल्याला या दोन्ही ग्रहांच्या बरोबर खाली दिसेल. दि.17 रोजी चंद्रकोर गुरू आणि शनिच्या वर दिसेल. पुढे दोन दिवस म्हणजे 19 तारखेपर्यंत हे दोन्ही ग्रह आपल्याला सहज वेगळे दिसू शकतील. पण, मग 20 ते 23 तारखेपर्यंत यांच्यातील कोनीय अंतर वशिष्ठ आणि अरुंधती यांच्या कोनीय अंतरापेक्षा कमी असेल. या युतीमध्ये शुभ-अशुभ असे काहीही नाही. मात्र, या ऐतिहासिक युतीचे साक्षीदार होण्याचा मिळणारा आनंद हा एक मोठा प्रभाव ठरेल.