दोन रुग्णांचा मृत्यू : उपचाराधीन रुग्णांची संख्या वाढली
पिंपरी – पिंपरी चिंचवड शहरामध्ये आज नवीन 172 करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. तर दोन रुग्णांचा मृत्यू झाला. आजपर्यंत शहरामध्ये 92331 जणांना करोनाची लागण झाली आहे.
महापालिकेच्या प्रसिद्धीपत्रकानुसार, सोमवारी चार वाजेपर्यंत शहरातील 172 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. तर शहराबाहेरील एकाही रुग्णाची नोंद झाली नाही. आज दिवसभरात दोन रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामध्ये शहरातील एक आणि शहराबाहेरील एकाचा समावेश आहे. आतापर्यंत शहरामध्ये 92331 रुग्णांची नोंद झाली आहे. तर 2298 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये शहराबाहेरील 669 जणांचा समावेश आहे.
आज दिवसभरात 178 रुग्णांना घऱी सोडण्यात आले. त्यामुळे आजपर्यंत घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची संख्या 88357 इतकी झाली आहे. तर दिवसभरात 2395 संशयित रुग्णांना महापालिकेच्या रुग्णालयामध्ये दाखल केले आहे. त्यापैकी काही जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे.
चाचणी अहवाल प्रतीक्षेत असलेल्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आज तब्बल 1870 रुग्णांचे अहवाल प्रतीक्षेत आहेत. तर उपाचाराधीन असलेल्या रुग्णांची संख्याही वाढली आहे.