बर्लिन – करोनाचा धोका अद्याप कायम असल्याने जर्मनीतील एका स्थानिक क्लबने आपल्या खेळाडूंचे दोन संघ तयार करुन आभासी प्रेक्षकांसमोर सामना खेळला. प्रेक्षकांच्या स्टॅण्डमधील खुर्च्यांवर काल्पनिक प्रेक्षकांचे चेहरे कार्डबोर्डवर चिकटवून आभास निर्माण करण्यात आला होता.
देशांतर्गत स्पर्धा प्रेक्षकांच्या गैरहजेरीत का होईना पण सुरु करण्याची मागणी गेले काही दिवस सुरु होती. अखेर या मागणीला परवानगी देण्यात आली व हा सामना चांगलाच रंगला. आयोजक व खेळाडूंनीच नव्हे तर या सामन्याचा वृत्तांतदेखील चांगलाच हिट ठरला.
करोना विषाणूंनी येथे देखील हाहाकार उडवला होता. हजारो नागरिकांना प्राण गमवावे लागले आहेत. त्यातून उभारी धरताना स्थानिक फुटबॉल क्लबनी सरकारकडे सराव सामने सुरु करण्यासाठी परवानगी मागितली होती. देशातील लॉकडाऊनमध्ये थोडी सवलत देऊन व प्रेक्षकांच्या आभासी प्रतिमा बसवून खेळला गेलेला हा सामना चांगलाच चर्चिला गेला. येथील प्रसिद्ध बोरसिया पार्क स्टेडियमवर हा सामना खेळला गेला.