रेडा -इंदापूर तालुका लॉकडाऊन असताना करोना बाधितांची संख्या नगण्य होती. मात्र, शासनाच्या सूचना आणि नियमांचे पालन करणार नसाल तर,इंदापूर तालुका पुन्हा लॉकडाऊन केला जाईल, असा निर्वाणीचा इशारा सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिला.
भरणे म्हणाले की, सध्या तालुक्यांमध्ये 1 हजार पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. जवळपास 480 रुग्ण उपचार घेत आहेत. यामुळे खबरदारी म्हणून शासनाने आखून दिलेले नियम तंतोतंत पालन केले जावेत, अशी अपेक्षा आहे. तालुक्यातील पोलिसांच्या माध्यमातून विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यासाठी मोहीम यशस्वीरित्या सुरू आहे. तरी देखील स्वतःच्या कुटुंबाची व तालुक्याची काळजी घेण्यासाठी नियम व स्वतःचे आरोग्य सुस्थितीत ठेवा, असेही आवाहन भरणे यांनी केले.
तालुक्यातील प्रशासनाला साथ देण्याची भूमिका नागरिकांनी मागील लॉकडाऊन कालावधीमध्ये घेतली होती. त्यामुळेच इतर तालुक्यांपेक्षा इंदापूर तालुक्यामध्ये कमी पॉझिटिव्ह सापडले होते. व्यापारी, छोटे, मोठे व्यावसायिक, नागरिकांनी शासनाने दिलेल्या सूचना काळजीपूर्वक पाळणे गरजेचे आहे, अशीही माहिती त्यांनी दिली.