बोगस अर्ज दाखल होत असल्याचे समोर
शाळास्तरावर अर्जांची कसून तपासणी करावी लागणार
पुणे – धार्मिक अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी असलेल्या प्री-मॅट्रिक शिष्यवृत्ती योजनेसाठी बोगस अर्ज दाखल होत आहेत. त्यामुळे शाळास्तरावर ऑनलाइन दाखल होणाऱ्या अर्जांची बारकाईने तपासणीची गरज निर्माण झाली आहे.
इयत्ता पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. “एनएसपी’ पोर्टलवर विद्यार्थ्यांना अर्ज करता येणार आहेत. केंद्र शासनाकडून एकूण 2 लाख 85 हजार 451 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. यासाठी धर्मनिहाय कोटाही निश्चित झाला आहे. 31 ऑक्टोबरपर्यंत विद्यार्थ्यांचे अर्ज दाखल करण्यासाठी सुविधा उपलब्ध राहणार आहे.
आतापर्यंत 10 हजार 39 अर्ज दाखल झाले. नूतनीकरणातील 38 हजार 629 अर्ज दाखल झाले. अल्पसंख्याक व प्रौढ शिक्षण संचालक सुनील चौहान यांनी राज्यातील जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकाऱ्यांची व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेतली. यावेळी समाज शिक्षणाधिकारी भाऊसाहेब कारेकर, एस. एन.शेख, संगणक अभियंता आशितोष पाटील आदी उपस्थित होते.
महाराष्ट्राबाहेरील राज्यातूनही या योजनेसाठी अर्ज दाखल होत आहेत. मूळ जिल्हा सोडून दुसऱ्या जिल्ह्यातूनही अर्जही येत आहेत. हे सर्वच अर्ज बनावट कागदपत्राद्वारे दाखल होत आहे. अर्जात खोटी माहिती भरली जात आहे. त्यामुळे शाळास्तरावर अर्जांची कसून तपासणी होणे आवश्यक आहे. चूकीचे अर्ज तत्काळ रद्द करावेत, अशा सूचना दिल्या.