राजगुरूनगर -राजगुरूनगर शहरालगत असलेल्या राक्षेवाडीमध्ये करोनाबाधित व्यक्ती सापडल्यानंतर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, जि. प. अध्यक्षा निर्मला पानसरे यांनी भेट दिली. राक्षेवाडीसह नगरपरिषदचे दोन वॉर्ड कंटेन्मेंट झोन (संक्रमणशील) भागात कडक नियम पाळा. या भागातील गरोदर महिलांना सर्व सुविधा उपलब्ध करा. रॅपिड इन्वेस्टिगेशन करून संबंधित माहिती वरिष्ठांपर्यंत तात्काळ द्या, असे आदेश आयुष प्रसाद यांनी स्थानिक प्रशासनाला दिले.
आयुष प्रसाद, निर्मला पानसरे यांनी अधिकारी व स्थानिक पोलीस पाटील, ग्रामविकास अधिकारी यांच्याशी चर्चा केली. यावेळी जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, प्रांताधिकारी संजय तेली, तहसीलदार सुचित्रा आमले, पोलीस निरीक्षक अरविंद चौधरी, गटविकास अधिकारी अजय जोशी, सभापती अंकुश राक्षे, जि. प. सदस्य बाबाजी काळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. बळीराम गाढवे, डॉ. उदय पवार, मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप, पोलीस पाटील पप्पू राक्षे, ग्रामविकास अधिकारी तुषार साळुंके उपस्थित होते.
आयुष प्रसाद म्हणाले, कंटेन्मेंट झोनसह बफर झोनमध्ये सर्वेक्षण करून सर्दी, खोकला, ताप असलेल्या व्यक्तींचे वर्गीकरण करून त्यांची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत लगेचच द्यावी. ज्या नागरिकांना बीपी, शुगरसारखे आजार आहेत अथवा 65 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या व्यक्ती आहेत, अशा व्यक्तींचे सर्वेक्षण करून त्यांची काळजी घ्यावी. रॅपिड इन्वेस्टिगेशनकडून वरिष्ठांना माहिती उपलब्ध करून द्यावी. जिल्हा परिषदेकडून पाहिजे ती मदत पुरवण्यात येईल. अधिकाऱ्यांनी राक्षेवाडीतील प्रत्येक कुटुंबातील एक व्यक्ती घेऊन व्हॉट्सऍप ग्रुप करून त्याद्वारे करोनाबाबतची माहिती सेक्टर अधिकाऱ्यांनी घ्यावी, अशा सूचना यावेळी करण्यात आल्या.
बाहेर गावाहून आलेल्यांना क्वॉरंटाइन करा
पुणे, मुंबई आदी रेड झोनमधून अनेक व्यक्ती तालुक्यात त्यांच्या मूळ गावी येत असल्याने गावागावात भीतीजन्य वातावरण पसरले आहे. ही बाब मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यावर त्यांनी महसूल आणि पोलीस यंत्रणेने याकडे विशेष लक्ष द्यावे. बाहेर गावावरून आलेल्या व्यक्तींना क्वॉरंटाइन करावे. जे घरी थांबत नाहीत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, असे आदेश दिले.