जनता वसाहतीत रुग्णांचा आकडा 13 वर
पुणे – भवानी पेठेतील “एसआरए’ इमारतीमधील करोनाबाधितांचा आकडा रविवारी 48 वर पोहचला आहे. येथील सुमारे 400 जणांचे स्वॅब तपासणीसाठी नेण्यात आले असून, त्यातील काही अहवाल प्राप्त झाले आहेत. तर जनता वसाहतीतील रुग्णांचा आकडा रविवारी 6 ने वाढून 13 वर गेला आहे.
भवानी पेठेतील सुमारे 400 घरे असलेल्या या इमारतीत खासगी रुग्णालयात काम करणारी आया राहत होती. तिला करोना झाल्याचे निष्पण झाल्यानंतर प्रशासनाने ही संपूर्ण इमारत सील केली आहे. त्यानंतर तब्बल 186 जणांचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते. त्यात आतापर्यंत सुमारे 48 बाधित आढळून आले आहेत. तर, आणखी काही अहवाल सोमवारी येणार आहे.
जनता वसाहत परिसरात करोनाने पाय पसरले असून, शनिवारी रात्री येथील बाधितांचा आकडा 13 वर पोहचला आहे. शहरातील ही सर्वाधिक दाट लोकवस्तीची झोपडपट्टी आहे.