मंचर – अधिक श्रावण महिना सुरू झाल्याने श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे शनिवारी (दि. 29) दर्शनासाठी भाविकांचा महापूर लोटला होता. दर्शन घेण्यासाठी भाविकांच्या चार किलोमीटर दूरवर रांगा लागल्या होत्या. भर पावसातच भाविकांना गर्दीमुळे धक्काबुकी खातच दर्शन घ्यावे लागले.
वाहनतळ ते एसटी बसस्थानक अंतरासाठी भाविकांची वाहतूक करण्यासाठी अवघ्या महामंडळाच्या 22 मिनी बस होत्या. त्यामुळे वेळेवर बस उपलब्ध होत नसल्याने भाविकांनी नाराजी व्यक्त केले. भाविकांना पावसात पायी चालत महादेवाचे दर्शन घ्यावे लागत असल्याने भाविक लहान मुले, वृद्ध व महिलांचे आतोनात हाल झाले. इतक्या दूर देवाला येऊन धक्काबुकी खातच कसेबसे दर्शन घेतल्याची संतप्त प्रतिक्रिया भाविकांनी व्यक्त केली.
श्रीक्षेत्र भीमाशंकर हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक तीर्थक्षेत्र असून एक चांगले पर्यटनस्थळ असल्याने येथे दररोज मोठ्या प्रमाणात भाविक, पर्यटकांची गर्दी होत आहे. यामध्ये सर्वांत जास्त गर्दी शनिवार, रविवार व अधिक श्रावण महिन्यात श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे भाविक मोठ्या प्रमाणात भर पावसात, दाट धुक, बोचरी थंडीत महादेवाचे दर्शन घेण्यासाठी येतात. दर्शन घेण्यासाठी दर्शन बारीत ताटकळत उभे राहावे लागत असल्याने भाविकांनी नाराजी व्यक्त केली आहे तसेच मिनी बस संख्या वाढवावी अशी मागणी भाविकांनी केली आहे.