श्रीनगर – श्रीनगरातील सुरक्षा दलाबरोबर आज झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले. ठार झालेल्या दोन्ही दहशतवाद्यांची ओळख पटली असून या दहशतवाद्यांचा सीआरपीएफ जवानांवर नुकत्याच झालेल्या हल्ल्यात हात होता असे पोलिसांनी सांगितले. परिसरात दहशतवादी असल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलाने शहरातील बिशेंबर नगर भागात घेराबंदी आणि शोध मोहीम सुरू केली.त्यावेळी ही चकमक झाली.
या चकमकीत सुरक्षा दलाचे तीन जवानही जखमी झाल्याचे त्यांनी सांगितले. दहशतवाद्यांनी चकमकीच्या ठिकाणी ग्रेनेड फेकले ज्यामुळे एक सीआरपीएफ जवान आणि दोन पोलिस कर्मचारी जखमी झाले. त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती धोक्याच्या बाहेर असल्याचे सांगण्यात येते. ठार झालेल्या दहशतवाद्यांच्या अन्य साथीदारांचाही शोध जारी आहे. त्यासाठी या परिसरात नाकाबंदी करण्यात आली आहे.