Flight Emergency Landing : अहमदाबादहून दुबईला जाणाऱ्या स्पाइसजेटच्या विमानाला वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीमुळे पाकिस्तानातील कराची येथील मोहम्मद अली जिना आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरावे लागले. कराची विमानतळाशी संबंधित अधिकाऱ्यांनी याविषयी माहिती दिली. स्पाइसजेट फ्लाइट क्रमांक SG-15 ने मंगळवारी रात्री आपत्कालीन लँडिंग केले. यावेळी एका 27 वर्षीय व्यक्तीला वैद्यकीय उपचार देण्यात आले.
नागरी विमान वाहतूक प्राधिकरणाच्या (सीएए) प्रवक्त्याने सांगितले की, “बोईंग 737 विमान अहमदाबादहून दुबईला जात असताना 27 वर्षीय प्रवासी धारवाल दरमेशला हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांना वैद्यकीय उपचारांची गरज आहे,” अशी माहिती नागरी उड्डाण प्राधिकरणाच्या (सीएए) प्रवक्त्याने दिली. त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांनी पाकिस्तानी हवाई वाहतूक नियंत्रकाशी संपर्क साधला. आणि परवानगी मिळाल्यानंतर रात्री 09:30 वाजता कराची विमानतळावर आपत्कालीन लँडिंग केले.
भारतातून दुबईला जाणारे विमान कराची विमानतळावर उतरताच बॉर्डर हेल्थ सर्व्हिस (बीएचएस) आणि सीएए डॉक्टर लगेचच पोहोचले. डॉक्टरांनी प्रवाशाला तात्काळ वैद्यकीय मदत दिली. CAA ने म्हटले आहे की, भारतीय विमान इंधन भरल्यानंतर आपल्या जाण्याच्या मार्गाकडे रवाना होईल असे सांगण्यात आले आहे.
नोव्हेंबर 2023 मध्ये अशाच एका घटनेत, भारतीय विमानाला कराचीच्या जिना आंतरराष्ट्रीय विमानतळावर एक प्रवासी आजारी पडल्यानंतर आपत्कालीन लँडिंग करावे लागले होते. त्यावेळी विमान जेद्दाहून हैदराबादला जात असताना हृदयविकाराचा झटका आल्याने प्रवाशाची प्रकृती खालावली. मंजुरी मिळाल्यानंतर विमानाचे कराची विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. सीएएच्या प्रवक्त्याने सांगितले की, तपासणीदरम्यान वैद्यकीय पथकाला आढळून आले की प्रवासी आधीच मरण पावला होता. तिची ओळख जोहरा अशी झाली.