महापालिकेत कॉंग्रेसची सत्ता आणण्यासाठी असंघटित कामगार कॉंग्रेसचे प्रयत्न
पिंपरी – आगामी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणूका फेब्रुवारी 2022 मध्ये होणार आहेत. आतापासूनच पक्ष संघटना बांधणीसाठी शहरातील सर्व कार्यकर्त्यांनी, वरिष्ठांनी सुरुवात करावी. त्यासाठी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह पक्ष श्रेष्ठींनी शहरात येऊन कार्यक्रम, बैठका घेऊन शहर कार्यकर्त्यांना प्रोत्साहन द्यावे यासाठी शहरातून त्यांना पाच हजार पत्रे पाठविण्यात येणार आहेत.
रविवारी (दि. 6 सप्टेंबर) असंघटीत कामगार कॉंग्रेसच्या पिंपरीतील कार्यालयात असंघटीत कामगार कॉंग्रेसचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष सुंदर कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली प्रमुख पदाधिका-यांची बैठक झाली. यावेळी कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी शहरात येऊन बैठका, कार्यक्रम घेऊन कार्यकर्त्यांना प्रोत्साहन द्यावे, यासाठी शहरातून बाळासाहेब थोरात यांना पाच हजार विनंती पत्र पाठविण्यात यावीत असा ठराव सर्वानुमते पास करण्यात आला.
या बैठकीत असंघटीत कामगार कॉंग्रेसच्या महिला शहराध्यक्षा शीतल कोतवाल, असंघटित कामगार कॉंग्रेसचे शहर उपाध्यक्ष संजय साळवी, ड्रायव्हर संघटना शहराध्यक्ष नवनाथ डेंगळे तसेच नितीन पटेकर, संजय कसबे, विजय शिंदे, मोहन उनवणे, सुरेश येवले, निलेश ओव्हाळ, लहू उकरंडे, नसीमा मोमीन, राजश्री वेताळे, सलमान शेख, मूनीरा शेख, महिरा शेख, स्वाती खैरे, संगिता बाबर, जयश्री साळुंखे, नाजुका भवार, लीला क्षीरसागर, सुमय्या मनियार, मल्लिका शेख आदी होते. तसेच परवीन शेख, संगीता वावरे, मालन गायकवाड यांनी असंघटित कामगार कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला.
यावेळी कांबळे म्हणाले की, प्रा. रामकृष्ण मोरे सरांच्या आकस्मिक निधनानंतर पिंपरी चिंचवड शहर कॉंग्रेस पोरकी झाली. तेंव्हापासून अद्यापपर्यंत कोणत्याही वरिष्ठ नेत्यांने मनापासून जबाबदारी घेतली नाही. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणून बाळासाहेब थोरात यांची निवड झाल्यापासून त्यांनी शहराला एकदाही भेट दिली नाही. त्यांनी शहरात यावे, अशी विनंती असंघटीत कामगार कॉंग्रेसतर्फे त्यांना शिष्टमंडळासह भेटून केली आहे. प्रास्ताविक शितल कोतवाल यांनी केले. सूत्रसंचालन नितीन पटेकर यांनी केले. संजय साळवी यांनी आभार मानले.
‘…तर सोनिया गांधींना पत्र पाठवू’
प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी 2 ऑक्टोबर गांधीजयंती पर्यंत विनंती पत्रांची दखल घेऊन प्रतिसाद दिला नाही तर 21 ऑक्टोबर 2020 पर्यंत शहरातील असंघटीत कामगार कॉंग्रेसचे कार्यकर्ते अखिल भारतीय कॉंग्रेसच्या अध्यक्षा खासदार सोनिया गांधी यांना पंचवीस हजार विनंती पत्र पाठवतील अशीही माहिती सुंदर कांबळे यांनी दिली.