मृताच्या नातेवाइकांनी लपविली करोनाबाबतची माहिती : कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांनाही लागण
पिंपरी – मयत व्यक्ती करोना बाधित असतानाही नातेवाइकांकडून याबाबत लपवा-छपवी केली जाते. मृत व्यक्तीला करोना झाला होता, याबाबतची माहिती न दिल्याने मृत व्यक्तीचे शवविच्छेदन करण्यात आले. यामुळे शवविच्छेदन करताना संपर्कात आल्याने पाच कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय करोनाबाधित झाले आहेत.
करोना बाधित रुग्णाचे शवविच्छेदन करू नये, अशा सूचना शासनाने दिल्या आहेत. त्याची अंमलबजावणीही पिंपरी चिंचवड महापालिकेकडून केली जात आहे. मात्र घरी मयत झालेल्या व्यक्तीचे नातेवाइक रुग्णालयात आणल्यावर मयत व्यक्तीस करोना असल्याबाबत माहिती देत नाहीत. यामुळे वायसीएम रुग्णालयातील सीएमओ डॉक्टर शवविच्छेदन करण्याबाबतच्या सूचना देत आहेत.
त्या रुग्णाचे शवविच्छेदन केले जाते. शवविच्छेदन करताना डॉक्टरांपेक्षा कर्मचारी मृतदेहाच्या जास्त संपर्कात येत असतात. अशाच दोन करोना बाधित असलेल्या मृतदेहांच्या संपर्कात आल्याने वायसीएम रुग्णालयातील 12 पैकी 5 कर्मचारी करोना बाधित आले आहेत. तसेच या कर्मचाऱ्यांमुळे त्यांच्या संपूर्ण कुटुबीयांनाही करोनाची बाधा झाली.
वायसीएम रुग्णालयात आणलेल्या एका मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. शवविच्छेदन झाल्यानंतर त्या मयताच्या नातेवाइकांनी मयत व्यक्तीची करोना चाचणी पॉझिटिव्ह असल्याची माहिती दिली. या वाढत्या प्रकारामुळे वायसीएम रुग्णालयाच्या शवविच्छेदन विभागातील कर्मचाऱ्यांचा जीव धोक्यात येत आहे. तर दुसरीकडे 12 पैकी 5 कर्मचारी क्वारंटाइन झाल्याने इतर कर्मचारी यांची साप्ताहिक सुट्टी आणि काम यांचा मेळ कसा घालायचा, असा प्रश्न वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर निर्माण झाला आहे.