पिंपरी (प्रतिनिधी) – पुणे जिल्ह्यामध्ये करोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे राज्य शासन, पुणे व पिंपरी चिंचवड महापालिका यांच्या वतीने नेहरुनगर येथील अण्णासाहेब मगर स्टेडियममध्ये जम्बो रुग्णालय उभारण्यात येत आहे. आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रुग्णालयाच्या कामकाजाची पाहणी केली. यावेळी त्यांनी हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना महापालिका प्रशासनाला दिल्या.
पुणे, शहरासह पिंपरी चिंचवडमध्येही करोनाने कहर केला आहे. शहरातील रुग्णसंख्या 15 ऑगस्टपर्यंत 50 हजार होईल असा अंदाज प्रशासनाने बांधला आहे. त्यामुळे करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेच्या वतीने विविध उपाययोजना केल्या जात आहे. वाढत्या रुग्णांच्या सोयीसाठी पिंपरी चिंचवड शहरातील नेहरूनगर येथे एक हजार बेडचे जम्बो रुग्णालय उभारण्यात येत आहे. सद्यस्थितीत येथे शेड उभारून निवारा करण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी मैदानामध्ये विभाग करण्यात आले आहे. सद्यस्थितीत दोन विभागांचा साठा उभारून पूर्ण झाला आहे. त्याची पाहणी उपमुख्यमंत्री पवार यांनी केली.
यावेळी पवार म्हणाले, दोन्ही शहरांमधील वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता प्रशासनाने सावध होणे आवश्यक आहे. रुग्णांची गैरसोय होता कामा नाही. त्यामुळे शक्य होईल तेवढ्या वेगात जम्बो रुग्णालयाचे काम पूर्ण करावे. यावेळी, विभागीय आयुक्त सौरव राव, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, उपमहापौर तुषार हिंगे, सभागृह नेते नामदेव ढाके, विरोधी पक्षनेते नाना काटे, शिवसेनेचे गटनेते राहूल कलाटे, मनसेचे गटनेते सचिन चिखले, संजोग वाघेरे, वैशाली घोडेकर आदी उपस्थित होते.