आणखी 194 जण करोनामुक्त; नवे 102 बाधित आढळले
पुणे – शहरात करोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे प्रशासनाची मोठी चिंता वाढली आहे. आजही (दि.10) शहरात नवीन 102 करोना बाधित व्यक्ती सापडले. दुसरीकडे आनंदाची बाब म्हणजे, रविवारी दिवसभरात करोनाला हरवून ठणठणीत बरे झालेल्या तब्बल 194 जणांना घरी सोडण्यात आले.
आतापर्यंत शहरात 2 हजार 482 बाधित व्यक्ती सापडले आहेत. त्यातील 144 जणांचा मृत्यू झाला आहे. तर बरे होऊन घरी गेलेल्या संख्येने हजाराचा टप्पा पूर्ण केला असून, बाधित व्यक्तीपैकी 1 हजार 20 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 92 जणांची प्रकृती चिंताजनक असून, त्यातील 17 जणांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे.
13 महिन्यांच्या बाळासह 5 जणांचा मृत्यू
वारजे माळवाडी परिसरातील 13 महिन्यांच्या बाळाला (मुलगी) 4 मे रोजी श्वसनाचा त्रास सुरू झाल्यामुळे ससून रुग्णालयात दाखल केले. मात्र, तिला ऍनिमिया, फुफ्फुसाचा त्रास, न्यूमोनियाचा त्रास होता. ती अशक्त असल्यामुळे रविवारी सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला.
तसेच गंजपेठेतील 37 वर्षीय आणि सोलापूर येथील 82 वर्षीय व्यक्तीला 7 मे रोजी ससून रुग्णलायात भरती केले. त्या दोघांचा शनिवारी रात्री मृत्यू झाला. ताडीवाला रोड परिसरातील 70 वर्षीय महिलेचा औंध येथील जिल्हा रुग्णालयात तर कोंढवा परिसरातील 53 वर्षीय व्यक्तीचा काशीबाई नवले रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.