जगातील अनेक देशांच्या संरक्षणविषयक खर्चात शीतयुद्धाच्या काळानंतरची सर्वाधिक वाढ 2019 मध्ये पाहायला मिळाली आणि 2020 मध्ये कोरोनाचे संकट जगावर कोसळले. अमेरिका आणि चीनपाठोपाठ या बाबतीत भारताचा जगात तिसरा क्रमांक आहे. नवउदारवादी धोरणे आल्यानंतर सार्वजनिक आरोग्यसेवेची झालेली हेळसांड आणि संरक्षणावरील वाढता खर्च यावर करोना विषाणूच्या प्रसाराच्या काळात चर्चा होणे स्वाभाविक आहे.
एक विषाणू संपूर्ण जगाचा शत्रू बनलेला असताना आणि लाखोंच्या संख्येने बळी जात असताना विविध देशांनी संरक्षणावर केलेल्या खर्चाकडे लक्ष वेधले जाणे स्वाभाविक आहे. हाच खर्च आरोग्यसुविधांवर करण्यात आला असता तर आपण या संकटाचा मुकाबला अधिक ताकदीने करू शकलो असतो, असे मतही मांडले जात आहे.
संरक्षणावर सर्वाधिक खर्च करणाऱ्या जगातील पहिल्या तीन देशांच्या यादीत भारत आणि चीनचा समावेश इतिहासात प्रथमच झाला आहे. गेल्या वर्षी जगाने संरक्षणावर केलेला खर्च विक्रमी होता, हेही समोर आले आहे. हाच खर्च जर जगाने आरोग्य सुविधांवर केला असता, तर आपण जगाचा सामूहिक शत्रू ठरलेल्या करोनाविरुद्ध अधिक ताकदीने लढलो असतो. किमान आज दिसते त्यापेक्षा चांगली परिस्थिती दिसली असती. कोविड-19 अर्थात करोनाचा विळखा जगाभोवती जसजसा अधिकाधिक घट्ट होत गेला, तसतशा आरोग्य यंत्रणेतील कमतरता अधिक तीव्रतेने समोर आल्या. नवउदारवादाचा स्वीकार केल्यानंतर सार्वजनिक आरोग्य सेवांची स्थिती कशी बिघडत गेली, यावरही मोठी चर्चा या निमित्ताने झाली आहे. एकीकडे सार्वजनिक आरोग्यासारखा महत्त्वाचा पैलू दुर्लक्षित केला जात असताना दुसरीकडे संरक्षणावर वारेमाप खर्च करण्याची गरज खरोखर होती का, हा चर्चेचा विषय बनला आहे.
लष्कराच्या सक्षमीकरणासाठी सर्वाधिक खर्च करणाऱ्या देशांमध्ये पहिल्या क्रमांकावर अर्थातच अमेरिका आहे. अमेरिकेने 2019 मध्ये अंदाजे 732 अब्ज डॉलर्सचा खर्च संरक्षणावर केला आहे. 2018 मध्ये केलेल्या खर्चापेक्षा तो 5.3 टक्के अधिक आहे आणि संपूर्ण जगभरात संरक्षणावर जेवढा खर्च केला गेला, त्याच्या 38 टक्के ही रक्कम आहे. दुसऱ्या क्रमांकावर चीन असून, 2018 मध्ये या देशाने संरक्षणावर जेवढा खर्च केला होता, त्यापेक्षा 2019 मध्ये केलेला खर्च 5.1 टक्के अधिक आहे. चीनचा संरक्षणावरील खर्च 2019 मध्ये 261 अब्ज डॉलर्सवर पोहोचला आहे. या यादीत भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे.
संरक्षणावरील खर्चाविषयीचा हा अहवाल स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूटने (सिपरी) तयार केला आहे. लष्करी खर्चातील वाढीच्या संदर्भात अमेरिका सलग दुसऱ्या वर्षी आघाडीवर राहिल्याचे हा अहवाल सांगतो. यापूर्वी सात वर्षे अमेरिकेच्या संरक्षणविषयक खर्चात सातत्याने कपात होताना दिसली होती. परंतु एकंदरीतच जगभरात अनेक देशांनी 2019 मध्ये आपल्या संरक्षणविषयक खर्चात वाढ केल्याचे दिसून आले.
गेल्या दहा वर्षांत लष्करी कारणांसाठीच्या खर्चात झालेली ही सर्वांत मोठी वाढ आहे. 2019 मध्ये जगातील सर्व देशांनी केलेला संरक्षणविषयक खर्च 1 हजार 900 अब्ज डॉलर्स एवढा प्रचंड होता. 2018 च्या तुलनेत जागतिक संरक्षण खर्चात 3.6 टक्क्यांची वाढ दिसून आली.
सिपरीच्या म्हणण्यानुसार, शीतयुद्ध समाप्त झाल्यानंतर संरक्षणावरील खर्चात सातत्याने कपातच होत गेल्याचे दिसून आले होते. मात्र 2019 मध्ये हा खर्च वाढला. शीतयुद्धानंतर संरक्षणावरील खर्चात ही सर्वांत मोठी वाढ होती. चीनविषयी बोलायचे झाल्यास गेल्या 25 वर्षांत जसजशी चीनची अर्थव्यवस्था विस्तारत गेली, तसतसा चीनचा संरक्षणावरील खर्चही वाढतच गेला आहे. जाणकारांच्या म्हणण्यानुसार चीनने संरक्षणात केलेली गुंतवणूक त्या देशाच्या सैन्याची महत्त्वाकांक्षा दर्शविणारा आहे.
चीनने सातत्याने संरक्षणावरील खर्चात केलेल्या वाढीच्या पार्श्वभूमीवर भारताने केलेली वाढ समजून घेता येते. सिपरीच्या म्हणण्यानुसार, चीन आणि पाकिस्तान या दोन्ही देशांशी भारताचे तणावपूर्ण संबंध असल्यामुळेच भारताकडून संरक्षण खर्चात वाढ झाली आहे. अर्थातच, चीनच्या अर्थव्यवस्थेचा आकार आणि संरक्षणविषयक खर्च या दोन्ही गोष्टी एकत्रितपणे पाहता भारताचा खर्च तुलनेने अधिक वाटणे स्वाभाविक आहे. भारताची अर्थव्यवस्था चीनपेक्षा आकाराने बरीच लहान असूनसुद्धा संरक्षणविषयक खर्चात भारताने चीनपाठोपाठ क्रमांक पटकावला आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर या घडामोडींचा वेध घेतल्यास भारताच्याही खर्चाच्या प्राधान्यक्रमाविषयी चर्चा होते.
– अपर्णा देवकर