नवी दिल्ली :- खेलो इंडिया पॅरा क्रीडा स्पर्धा येत्या डिसेंबर महिन्यात होणार आहेत, असे केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनी जाहीर केले आहे. ही स्पर्धा येत्या 10 ते 17 या कालावधीत राजधानी दिल्लीतच आयोजित केल्या जाणार आहेत. या स्पर्धेत 32 राज्ये तसेच केंद्रशासित प्रदेशातील मिळून एकूण 1,350 खेळाडू विविध क्रीडा प्रकारात सहभागी होतील.
या स्पर्धेमुळे देशाच्या पॅरा क्रीडा स्पर्धांमध्ये क्रांती घडेल व त्यालाही तळागाळापर्यंत पोहोचवता येणार आहे. याच स्पर्धेच्या माध्यमातून नवी गुणवत्ता पुढे येईल, असेही ठाकूर म्हणाले. या स्पर्धेत एकूण सात क्रीडा प्रकारात हे खेळाडू पदकांसाठी लढत देतील.
ही स्पर्धा 10 डिसेंबरला सुरू होईल, तर 17 डिसेंबरला तिचा समारोप होईल. ही स्पर्धा दिल्लीतील विविध स्टेडियममध्ये आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी क्रीडा वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. 10 ते 13 डिसेंबर दरम्यान नेहरू स्टेडियमवर अॅथलेटिक्स स्पर्धा होणार आहेत.
8 व 9 डिसेंबर रोजी जवाहरलाल नेहरू स्टेडियम (प्रशिक्षण) येथील फुटबॉल मैदानात तिरंदाजी स्पर्धा होणार आहे. 7 ते 9 डिसेंबर दरम्यान जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर सीपी फुटबॉल खेळला जाईल. इंदिरा गांधी स्टेडियमवर 8 ते 10 डिसेंबर दरम्यान पॅरा बॅडमिंटन, 8 ते 15 डिसेंबर दरम्यान करणी सिंग शूटिंग रेंज येथे पॅरा शुटींग आणि 9 ते 13 डिसेंबर दरम्यान इंडोअर जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर पॅरा पॉवर लिफ्टिंगचे आयोजन करण्यात येणार आहे.