नवी दिल्ली – दिल्ली महिला आयोगाच्या प्रमुख स्वाती मालीवाल यांनी दिल्लीतील बस थांब्यांची आज सलग दुसऱ्या दिवशी पाहणी केली. या बसथांब्यावर महिला सुरक्षेचे काय उपाययोजण्यात आले आहेत याचीही त्यांनी माहिती घेतली. त्या म्हणाल्या की, आम्हाला दिल्लीच्या अनेक भागांतून तक्रारी येत आहेत की दिल्लीत अनेक बस स्टॉप आणि रस्ते असे आहेत जिथे लाईट नाही आणि असे बरेच रस्ते आहेत जिथे दिव्यांचे पोल आहेत पण दिवे नाहीत.
ललिता पार्क, रमेश पार्क आणि बकरवाला बस थांब्यांची त्यांनी पाहणी केली. ही सर्व बसस्थानके अंधारात असल्याचे दिसून आले.मालीवाल म्हणाल्या की, गेल्या वर्षभरापासून अशा ठिकाणी पथदिवे सुरू नसल्याच्या महिलांनी तक्रारी केल्या आहेत. त्याचा आम्ही पाठपुरावा करीत आहोत.
त्या म्हणाल्या की देशाची राजधानी असलेल्या दिल्लीतील बस थांब्यांची ही अवस्था असेल तर महिला सुरक्षित कशा राहतील? आम्ही बसमधून प्रवास केला आणि महिला प्रवाशांशी संवाद साधला. त्या सांगत आहेत की गेल्या वर्षभरापासून या ठिकाणांची हीच अवस्था आहे. बस थांब्यांच्या दीड किलोमीटरच्या पट्ट्यात दिवे नाहीत,या मुद्द्यावर आम्ही दिल्ली सरकारला नोटीस बजावतआहोत असे त्या म्हणाल्या.या सुरक्षेकडे लक्ष न देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणीही त्यांनी केली.